चिपळूण : शहरातील बुरूमतळी येथे आज सकाळी सव्वा सात वाजता ऐश्वर्या चितळे यांच्या दाराजवळ गाय व्यायल्याची माहिती ज्येष्ठ नगरसेवक श्री शशिकांत मोदी यांना मिळाली. ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने चिपळूण नगरपरिषद आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते यांना कळविले.

निवाते यांनी तात्काळ दखल घेत सकाळी ८ वाजता नगरपरिषदेची टीम घटनास्थळी पाठवली. वासरू गाडीत ठेवण्यात आले, मात्र गाय सैरावैरा पळू लागल्याने तिला पकडणे अवघड झाले.

यावेळी नगरसेवक निहार कोवळे आणि संदीप भिसे यांनीही पशुवैद्यकीय डॉक्टरांना घटनास्थळी बोलावले. नगरपरिषदेचे आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नानंतर सव्वा आठ ते दहा वाजेपर्यंत चाललेल्या जवळपास पावणे दोन तासांच्या मोहिमेनंतर गायीला पकडून वासरासह टेम्पोमध्ये भरून उपचारासाठी हलविण्यात आले.

या मोहिमेत गो सेविका राधाताई लवेकर, अनिकेत साळवी, नगरसेवक शशिकांत मोदी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या काळात मुंबई-गोवा महामार्ग सुमारे अर्धा तास रोखून धरण्यात आला होता. स्थानिक नागरिक, रिक्षाचालक आणि विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.