खेड :आज त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून खेड शहरातील जगबुडी नदीचे जलपूजन करण्यात आले. यावेळी परिसरात एक हजार पणत्या प्रज्वलित करून, नदी परिसराची स्वच्छता करत दीपोत्सव साजरा करण्यात आला. एक हजार पणत्या लावून नदीचे पूजन करण्यात आले. पूजनानंतर सर्व खेडवासीयांनी नदीची आरती केली. त्यानंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे कौतुक करताना नगराध्यक्षा बुटाला मॅडम म्हणाल्या की, “हा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे. आपण पाण्याची बचत केली पाहिजे आणि पाण्याचा वापर जपून केला पाहिजे.” असा संदेश त्यांनी खेडवासीयांना दिला. त्यानंतर मंडळाचे मंदार आपटे यांनी सर्व खेडवासीयांना दीपोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शेतकरी बळीराजाला संकटांचा सामना करण्याची ताकद मिळावी, अशी प्रार्थना मंडळाच्या वतीने करण्यात आली.
मंडळाचे सर्वेसर्वा महेंद्र जंगम यांनीही पुढील वर्षी अशाच प्रकारचे उपक्रम राबविण्याचे आश्वासन खेडवासीयांना दिले. यानंतर शिवसेनेचे गटनेते निकेतन पाटणे यांनी बळीराजावर आलेल्या संकटांचा सामना करण्याची ताकद सर्वांना मिळावी आणि जगबुडी नदी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प आपण सर्वांनी करावा, असे आवाहन उपस्थितांना केले. या कार्यक्रमाला खेडवासीयांसह व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी शिवसेनेचे गटनेते निकेतन पाटणे, नगरसेवक स्वप्निल शेवडेकर, यश खेडेकर, शहरप्रमुख कुंदन सातपुते, राजूशेठ बुटाला, भूषण चिखले, भाजपच्या वैभवी खेडेकर, स्वप्नाली चव्हाण, नंदू साळवी, पत्रकार सदानंद जंगम, अनेक व्यापारी तसेच नगरपालिकेचे परशुराम पाथर यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
