संगमेश्वर :- तालुक्यातील आंगवली लाखणवाडी येथील तीव्र उतारात रिक्षा पलटी होऊन बोंड्ये येथील रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. विजय काशिराम चव्हाण (५२, रा. बोंड्ये) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय चव्हाण हे प्रवाशांना आणण्यासाठी रिक्षाने जात असताना आंगवली लाखणवाडी येथील तीव्र उतारात त्यांची रिक्षा अचानक पलटी झाली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच आंगवलीचे माजी सरपंच संतोष अणेराव, पोलीस पाटील सतीश अणेराव, पंचायत समिती सदस्य मंगेश बांडागळे, अनंत जाधव आणि ललिता गुडेकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी विजय चव्हाण यांना तातडीने देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. विजय चव्हाण यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच बोंड्ये येथील ग्रामस्थ तसेच देवरूख परिसरातील रिक्षाचालकांनी देवरूख ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. या घटनेमुळे बोंड्ये परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.