मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये पक्ष संघटना मजबूत करून मोठ्या उमेदीने पुढे जायचे आहे. पूर्ण ताकदीने पक्ष उभा करण्याची चर्चा झाली, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले की, फार मोठ्या उमेदीने पक्ष पुढे नेण्यासाठी सर्वांचा सहभाग असावा. त्यात खासदार असतील, आमदार असतील, तसेच ज्यांनी निवडणुका लढवल्या आहेत त्या सर्वांना बरोबर घेऊन आणि सर्वांनी वेळ देऊन महाराष्ट्रात शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सक्षम विरोधी पक्ष म्हणून पक्ष उभा करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार तसेच खासदारांनी आपापली भूमिका मांडली. तसेच, हे आधी स्पष्ट करतो की, विलीनीकरणाचा विषय संपलेला आहे. यापुढे विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा होणार नाही. आम्ही सक्षमपणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष म्हणून आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, आमच्याकडे नेता म्हणून जो चेहरा आहे, तो घेऊन महाराष्ट्रात जाणार आहोत, असे शशिकांत शिंदे म्हणाले.
शशिकांत शिंदे म्हणाले की, मी मघाशीच सांगितले, आदरणीय शरद पवार साहेबांची अनेकांनी भेट घेतली. अनेक जण त्यांना भेटत असतात. त्याचा काही वेगळा अर्थ काढू नये. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नाही. कोणताही प्रयत्न नाही, असेही शशिकांत शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले.