चिपळूण : इंडियन असोसिएशन ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट आणि भ. क. ल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण विभागातील पहिली राज्यस्तरीय मायक्रोबायोलॉजी परिषद ‘महा-मायक्रो कॉन २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद ५ व ६ सप्टेंबर २०२६ रोजी डेरवण येथील वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयात होणार असून, राज्यासह देशभरातील नामवंत मायक्रोबायोलॉजी तज्ज्ञ, प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी आणि विद्यार्थी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
संसर्गजन्य आजारांचे बदलते स्वरूप, त्यांचे अचूक व जलद निदान तसेच उपचारांमधील आधुनिक पद्धती याबाबत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून या परिषदेत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. कोविड-१९, एचआयव्ही, मलेरिया, क्षयरोग, अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स, फंगल इन्फेक्शन्स यांसह सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने आणि चर्चासत्रे होणार आहेत.
परिषदेत क्षयरोग व मलेरिया नियंत्रण, ‘वन हेल्थ’ संकल्पना, उदयोन्मुख बुरशीजन्य संसर्ग, रेबीज, व्हायरल हिपॅटायटीस, कोविड-१९ चे नवीन व्हेरियंट्स, अँटीमायक्रोबियल स्ट्यूवर्डशिप आणि एचआयव्ही निदान या विषयांवर विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. बदलत्या संसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर निदानशास्त्र, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि प्रभावी उपचारपद्धती याबाबत या परिषदेत विचारमंथन होणार आहे.
‘महा-मायक्रो कॉन २०२६’मध्ये सुमारे २५० प्रतिनिधी सहभागी होणार असून, राज्यातील सुमारे १५ वैद्यकीय महाविद्यालयांमधील जवळपास ९० पदव्युत्तर विद्यार्थी, नर्सिंग स्टाफ तसेच वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कोकणातील वैद्यकीय शिक्षण आणि संसर्गजन्य आजारांच्या अभ्यासाच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सहभागी डॉक्टर, विद्यार्थी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मायक्रोबायोलॉजी क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान आणि बदलत्या वैद्यकीय तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे.
ही परिषद मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. योगेंद्र शेळके, डॉ. वनिता कुलकर्णी, डॉ. मीना रामतीर्थकर, वैद्यकीय संचालिका डॉ. सुवर्णा पाटील आणि कॉलेज समन्वयक डॉ. नेताजी पाटील यांच्या अथक प्रयत्नातून साकार होत आहे. संबंधित मायक्रोबायोलॉजी विभागाच्या पुढाकाराने परिषदेचे नियोजन करण्यात आले आहे.
या परिषदेला रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. जयप्रकाश रामानंद, डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भास्कर जगताप तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील अन्य मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
कोकण विभागात प्रथमच राज्यस्तरीय मायक्रोबायोलॉजी परिषद आयोजित होत असल्याने ‘महा-मायक्रो कॉन २०२६’ ही भ. क. ल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या माध्यमातून कोकणातील वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि संसर्गजन्य आजारांच्या क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण होण्यास मोठी मदत होणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.