चिपळूण : तालुक्यातील काही भागात विशेषत : मार्गताम्हणे खुर्द, कौढरताम्हणे, उमरोली, ढोक्रवली. खांडोत्री या गावांमध्ये काही ठिकाणी नाचणीवर शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. सदर ठिकाणी शिवाजी शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी चिपळूण शिवाजी शिंदे, सहाय्यक प्राध्यापक समीर काळे, चिपळूण तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे, आणि मंडळ कृषी अधिकारी यांनी याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी पुढील प्रमाणे एकात्मिक व सामुदायिक नियंत्रण उपाययोजना सांगितलेले आहेत.

एकात्मिक व सामुदायिक नियंत्रण उपाययोजना

भौतिक व यांत्रिक नियंत्रण करताना
सकाळी किंवा संध्याकाळी बाहेर पडलेल्या गोगलगायी व त्यांची साबुदाण्यासारखी अंडी हाताने/चिमट्याने वेचून उकळत्या पाण्यात, साबणाच्या/मिठाच्या द्रावणात टाकून किंवा ३ फूट खोल खड्ड्यात पुरून त्यावर चुना टाकून नष्ट कराव्यात.
गोगलगायी पोत्यात भरून त्यावर मीठ किंवा चुन्याची पावडर टाकावी.
संध्याकाळी शेतात ७-८ मीटर अंतरावर गवताचे ढीग किंवा गुळाच्या द्रावणात भिजवलेली गोणपाटाची पोती ठेवून सकाळी त्याखाली जमा झालेल्या गोगलगायी नष्ट कराव्यात.
पिकाच्या चोहोबाजूने २ मीटर रुंदीच्या राखेच्या पट्ट्यावर मोरचूद अधिक चुना (२:३) यांचा पातळ थर द्यावा.

रासायनिक उपाययोजना करताना दाणेदार मेटाल्डिहाइड २ किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्या.
पिकाच्या बांधाच्या आतील बाजूस मेटाल्डिहाइड २.५ टक्के (स्नेलकिल) या औषधाच्या गोळ्या ५ ते ७ फूट अंतरावर टाकाव्यात. सदर औषध गोगलगायींना आकर्षित करते व गोळीचे सेवन केल्यानंतर गोगलगायी नियंत्रणात येतात.

कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या अवस्थेतच ओळखून तातडीने नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. विशेषतः सकाळी ६ ते ८ या वेळेत नियमित पाहणी करून गोगलगायी व त्यांचे आश्रयस्थाने नष्ट करावीत. शेतकऱ्यांनी एकत्रितपणे उपाययोजना केल्यास गोगलगायीच्या प्रादुर्भावावर प्रभावी नियंत्रण मिळविता येईल. असे उपविभागीय कृषी अधिकारी, चिपळूण शिवाजी शिंदे यांनी सांगितले.