सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गच्या समुद्रात मासेमारी नौका बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात आज, 1 सप्टेंबर रोजी सकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास ‘सागरिका’ ही मासेमारी नौका अचानक बुडाली. या नौकेतून मालवणच्या दांडी येथील नौका मालक सन्मेश सुरेश परब, त्यांचा मुलगा सुयोग सन्मेश परब आणि खलाशी अक्षय हनुमंत राणे मासेमारीसाठी गेले होते.

नौका बुडाल्यानंतर सुयोग परब यांना जयदेव लोणे यांच्या नौकेने पाण्यातून सुखरूप बाहेर काढलं. मात्र नौका मालक सन्मेश परब आणि खलाशी अक्षय राणे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोघांचेही मृतदेह सापडले असून, या दुर्घटनेमुळे मालवणच्या दांडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.