चिपळूण : चिपळूण शहरातील अत्यंत वर्दळीच्या छत्रपती शिवाजी चौक ते बहादूरशेख नाका तसेच छत्रपती शिवाजी चौक ते पाग पॉवर हाऊस (स्वातंत्र्यवीर सावरकर चौक) या प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या प्रक्रियेला चिपळूण नगरपरिषद प्रशासनाने वेग दिला आहे. प्रस्तावित रुंदीकरणासाठी ताब्यात घेण्यात येणाऱ्या जागांचे मोजमाप व मूल्यांकन करण्याचे काम बुधवार, २ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भात संबंधित बाधित जागा मालकांना नगरपरिषदेकडून यापूर्वीच नोटिसा बजावून सूचित करण्यात आले आहे.
‘स्मार्ट सिटी’च्या दृष्टीने नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा पुढाकार
चिपळूण शहराला ‘स्मार्ट सिटी’चे रूप देण्यासाठी तसेच शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी प्रमुख रस्ते रुंद असणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी पुढाकार घेत प्रशासनाकडून परिपूर्ण तांत्रिक अहवाल व नियोजन तयार करून घेतले आहे. या महत्त्वाकांक्षी विकासकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून विशेष प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. या प्रस्तावांना राज्य शासनाकडून प्राथमिक स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर नगरपरिषदेने आता प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात केली आहे.
जागांचे होणार रेखांकन आणि मोजमाप
यापूर्वी प्राथमिक स्तरावर रस्ता रुंदीकरणाची मोजमापे घेण्यात आली होती. त्यानुसार संबंधित जागा मालकांना दोन वेळा नोटिसा देऊन बाधित जागेबाबत आपली भूमिका मांडण्याची तसेच प्रशासनाकडून असणाऱ्या अपेक्षा कळविण्याची संधी देण्यात आली होती.
आता प्रत्यक्ष अंमलबजावणीचे पहिले पाऊल म्हणून प्रशासनाकडून २ सप्टेंबरपासून दोन्ही बाजूंनी आवश्यक जागांचे मोजमाप, मूल्यांकन आणि रेखांकन (मार्किंग) करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले जाणार आहे. त्यामुळे शहरातील या दोन्ही प्रमुख मार्गांच्या रुंदीकरण प्रक्रियेला आता प्रत्यक्ष गती मिळणार आहे.