चिपळूण : राज्य शासनाने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ ही शेतकऱ्यांना दिलासा देणारी नसून अनेक जाचक अटींमुळे ती प्रत्यक्षात कर्जमाफीऐवजी कर्जवसुलीची योजना ठरत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात आज चिपळूण येथील तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना निवेदन सादर करून शेतकऱ्यांना कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली.
शासनाच्या नव्या धोरणानुसार २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांपर्यंतच कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे लाखो शेतकरी या योजनेच्या पूर्ण लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारने अशा प्रकारची दुजाभावाची भूमिका न घेता सर्व पात्र शेतकऱ्यांना समान न्याय देऊन सरसकट कर्जमाफी लागू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
प्रोत्साहनपर अनुदानासाठी सलग चार वर्षे नियमित कर्जफेड करण्याची अट देखील अन्यायकारक असल्याचे पक्षाने म्हटले आहे. गेल्या तीन वर्षांत सततची नापिकी, अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती आणि शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवर अतिरिक्त अटी लादण्याऐवजी शासनाने त्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनामध्ये २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी असलेली ५० हजार रुपयांची मर्यादा रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी देणे, एकवेळ समझोता (OTS) अंतर्गत २ लाख रुपयांवरील रक्कम आधी भरण्याची अट रद्द करणे, प्रोत्साहनपर अनुदानासाठी असलेली सलग चार वर्षे नियमित कर्जफेडीची अट हटविणे, २०१७ च्या कर्जमाफीसाठी पात्र असूनही कागदपत्रांच्या अभावी लाभापासून वंचित राहिलेल्या ६.५६ लाख शेतकऱ्यांना तात्काळ लाभ देणे, पीकविमा योजनेतील शेतकरीविरोधी अटी रद्द करून १ रुपयांत पीकविमा योजना पुन्हा सुरू करणे तसेच पेरणीपूर्वी कर्ज खात्यांचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांच्या खात्यात आवश्यक रक्कम जमा करण्याच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
गेली तीन वर्षे सततची नापिकी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून या संकटातून त्याला बाहेर काढण्यासाठी शासनाने कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिपळूण तालुका अध्यक्ष राजेश केळसकर, तालुका कार्याध्यक्ष शिरीषभाऊ काटकर, ज्येष्ठ नेते सतीश आप्पा खेडेकर, माजी नगरसेवक संजय तांबडे,माजी नगरसेविका सीमा ताई चाळके,महिला जिल्हाध्यक्षा दीपिका कोतवडेकर, युवक जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय केदारी, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष रईस अल्वी, महिला तालुका अध्यक्षा अरुणा आडविलकर, शहराध्यक्ष समीर देसाई, नगरसेविका नसरीन खडस, महिला शहराध्यक्षा रुक्सार अल्वी,हनुमंत केदारी, दत्ता शेठ पवार,सत्येद्र सिंग,युवक शहराध्यक्ष मुन्ना जसनाईक, रुपेश पालशेतकर,नियाज सनगे, नसीम सय्यद,मनोहर खेडेकर, महिला उपाध्यक्षा दीपिका कोलतेकर आदी उपस्थित होते.
