खोपोली : श्रावणमासी हर्षमानसीचा आनंद द्विगुणित करत महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारी आणि पारंपरिक संस्कृतीचा वसा पुढील पिढीकडे सोपविण्याचा संदेश देणारी मंगळागौर पारंपरिक लोकनृत्य स्पर्धा २०२६ , महाराजा मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. विक्रम साबळे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला खोपोलीसह खालापूर तालुक्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण मंगल कार्यालय महिलांच्या उपस्थितीने फुलून गेले होते.
यावेळी महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांसह नृत्य, संगीत, योग, उखाणे आणि विविध कलांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे ज्येष्ठ महिलांपासून तरुणींपर्यंत सर्व वयोगटातील महिलांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे. त्यांनी महिलांशी मनमोकळ्या गप्पा मारत कार्यक्रमात सहभाग घेतला. पारंपरिक फुगडीमध्ये सहभागी होत त्यांनी महिलांचा उत्साह वाढविला. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमातील उत्साहाला आणखी उधाण आले.
पारंपरिक संस्कृतीसोबत सामाजिक संदेश
मंगळागौर कार्यक्रमाला पारंपरिक खेळांच्या पलीकडे सामाजिक संदेशाची जोड देण्यात आली. महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देतानाच महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि सामाजिक सहभागाचे महत्त्व विविध उपक्रमांतून अधोरेखित करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा प्रिया मुकादम यांनी भाजप युवा नेते विक्रम साबळे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून उपस्थित महिलांशी संवाद साधत महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि विविध धोरणात्मक विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी नगरसेविका सानिया शेख, अश्विनी अत्रे, प्रतीक्षा रेटरेकर, सामाजिक कार्यकर्त्या गीता अविनाश तावडे, ज्योती पाटील, सायली मसुरकर, अर्चना मोरे तसेच अन्य महिला मान्यवर आणि भाजप खोपोली मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्पर्धेच्या तिसऱ्या वर्षात विजेत्या महिलांसाठी एकूण १२ आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये ५ सोन्याच्या नथींचा समावेश होता. प्रथम क्रमांकासाठी ७,७७७ रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी ५,५५५ रुपये व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकासाठी ३,३३३ रुपये व सन्मानचिन्ह ठेवण्यात आले होते.
याशिवाय विविध स्पर्धांमध्ये विजेत्या महिलांना पैठणी साड्या, सोन्याच्या नथी, चांदीच्या मूर्ती आणि अन्य आकर्षक भेटवस्तू जिंकण्यासाठी मोठा उत्साह पहायला मिळाला. द्वारकादास शामकुमार व इंद्रायणी साडी सेंटर, आर. टी. झवेरी ज्वेलर्स, मनिष ज्वेलर्स, इंद्रायणी साडी सेंटर यांच्याकडून बक्षिसांसाठी सहकार्य करण्यात आले.
कार्यक्रमात अंबरनाथ येथील जागर मंच या अनेक मराठी वाहिन्यांवर सादरीकरण करणाऱ्या आणि विविध पुरस्कारांनी गौरविलेल्या मंडळाने पारंपरिक मंगळागौरीचे विशेष सादरीकरण केले. त्यांच्या कलाविष्काराने उपस्थित महिलांना पारंपरिक संस्कृतीची समृद्ध अनुभूती मिळाली.
०६ गटांतुंन विजेत्यांच्या निवडीसाठी स्पर्धा परीक्षक म्हणून मीनाक्षी पटवर्धन, माधुरी आठवले यांना जवाबदारी देण्यात आली होती
यावेळी बोलताना विक्रम साबळे यांनी सांगितले की, महिलांना आपल्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना आनंदाचा क्षण अनुभवता यावा आणि आपली संस्कृती पुढील पिढीकडे पोहोचावी, या उद्देशाने मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांसाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने सुरू ठेवण्याचा प्रयत्न राहील.”
अभिनेत्री ऋतुजा बागवे यांनीही खोपोलीकर महिलांना मिळालेल्या या व्यासपीठाचे कौतुक करत महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाचे विशेष अभिनंदन केले.
सामाजिक उपक्रमांचीही परंपरा
विक्रम साबळे फाउंडेशनच्या माध्यमातून वर्षभर विविध लोककल्याणकारी उपक्रम राबविले जात असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. लोक उपयोगी शिबिरांसह विविध सामाजिक उपक्रमात दहीहंडी, मंगळागौर, गणेश आरास, शालेय आणि मैदानी क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून खोपोलीकरांना विविध क्षेत्रांत आपले कौशल्य सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.u
पारंपरिक संस्कृती, महिलांचा उत्साह, कलागुणांना प्रोत्साहन आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने महाराजा मंगल कार्यालयात दिवसभर मंगळागौरीच्या खेळांचा, नृत्याचा आणि आनंदाचा जल्लोष पाहायला मिळाला.