गुहागर : गुहागर एस.टी. आगारात महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्ड वाटप सुरू करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात कार्ड असूनही महिलांकडून पूर्ण तिकीट वसूल केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच कार्ड रिचार्ज कुठे करायचा, वापरण्याची प्रक्रिया काय याबाबत कोणतीही माहिती दिली जात नसल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड संभ्रम असून अनागोंदी कारभार सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने गुहागर आगार व्यवस्थापक यांची भेट घेऊन जाब विचारण्यात आला.
या वेळी शिवसेना तालुका महिला संघटिका सौ. सिद्धीताई सुर्वे यांनी, NCMC कार्ड असूनही सवलत का दिली जात नाही, रिचार्जची अधिकृत प्रक्रिया काय आहे, याबाबत तात्काळ खुलासा करावा व प्रवाशांची होणारी लूट थांबवावी अशी मागणी केली.
यावेळी शिवसेना तालुका महिला आघाडी संघटिका सौ. सिद्धी ताई सुर्वे,रानवी ग्रामपंचायत सरपंच सौ. मनाली कदम, युवा सेना तालुका प्रमुख श्री. निनाद नार्वेकर, युवा सेना शहर प्रमुख श्री. राज विखारे, गुहागर शहर विभाग प्रमुख श्री. संतोष गुहागरकर, गुहागर शहर महिला उपसंघटिका श्रीमती संगीता वराडकर, शाखाप्रमुख श्री. कल्पेश बागकर, युवा सेना शाखाप्रमुख कु. आर्य पाटील, कु. पुरुषोत्तम गुरव यांच्यासह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रकरणी तात्काळ सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
