मुंबई : जनाब संजय राऊत, भाजपा निवडणूक जिंकली की निवडणूक आयोग चुकीचा. भाजपाला सुप्रीम कोर्टात एखादे यश मिळाले की सुप्रीम कोर्ट चुकीचे आणि आता भाजपाच्या काळात जीडीपी वाढला की जीडीपी चुकीचा, असा जावईशोध लावण्याआधी तुम्हाला ”जीडीपी” मधला ‘जी’ तरी कळतो का, याचे आत्मपरीक्षण करा. तुम्ही ज्या पद्धतीने राहुल गांधींची गुलामी करता, ती गुलामगिरीच तुम्हाला कळते; जीडीपी तुम्हाला कळत नाही, अशा शब्दात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी त्यांचे वाभाडे काढले. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय राऊत, किती रडणार? पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देश पुढे जातो आहे, तर तुम्ही जीडीपीच्या आकड्यांवर शंका घेताय. तुम्ही सांगताय की जीडीपी फक्त दोन टक्के आहे. जीडीपीचे आकडे खोटे आहेत. भाजपा निवडणूक जिंकते, लोक तुम्हाला घरी बसवतात तेव्हा म्हणता की ईव्हीएममध्ये गडबड आहे, निवडणूक आयोग बोगस आहे, निवडणूक आयोग दोषी आहे. हे म्हणजे एखाद्या परीक्षेला विद्यार्थी नापास झाला की, ‘परीक्षा पद्धत चुकीची आहे म्हणून मी नापास झालो’ आणि बाकीचे विद्यार्थी पास झाले कारण त्यांच्यासाठी परीक्षा चांगली होती, असे म्हणण्यासारखे आहे, अशी खिल्ली श्री. बन यांनी उडवली.
श्री. बन पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी युद्धाच्या काळात देशाची अर्थव्यवस्था अतिशय समर्थपणे, सक्षमपणे हाताळली. आपल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर अतिशय चांगल्या पद्धतीने कायम ठेवला, म्हणून संजय राऊतांची पोटदुखी सुरू आहे. त्यांना वाटत होते की पाकिस्तानचे आणि इतर देशांचे हाल झाले तसे भारताचे व्हावेत. परंतु तसे होणार नाही. हे मोदीजींचे सरकार आहे. हे तुमच्यासारख्या घरबशा लोकांचे सरकार नाही, हे ध्यानात ठेवावे. प्रत्येक आकडेवारी आली की खोटी आहे, हे सांगणारे संजय राऊत, तुमच्याकडे पुरावा असेल तर सादर करा आणि अन्यथा वायफळ बडबड करू नका
उद्धव ठाकरे कपिल सिब्बल यांना नेमकी किती फी देत आहेत, आपला खटला वाचवण्यासाठी किती करोडो रुपयांचा खर्च करत आहेत, असे सवाल करून श्री. बन म्हणाले, मातोश्रीच्या बाहेरच्या चिंचेचे चिंचोके काढून कपिल सिब्बल यांना दिले जात आहेत का? हे एकदा संजय राऊत यांनी सांगावे. अन्यथा आम्ही भांडुपमध्ये ज्या ज्या चिंचा आहेत, त्यांचे सगळे चिंचोके जमा करून कपिल सिब्बल आणि काँग्रेसला देणार, हे एकदा संजय राऊत यांनी जाहीर करावे.
वांग्याच्या शेतीतून करोडो कसे कमावले हे सुप्रियाताईंनी एकदा सांगावे
सुप्रियाताई सुळे दुर्दैवाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा फोटो काढल्याचे समर्थन करतात. आपल्याला लोकांनी निवडून दिले आहे, खासदार केले आहे. देशाचा प्रोटोकॉल तुम्हालाही माहिती आहे. परंतु सुप्रियाताईंना एकच माहिती आहे की, वांग्याच्या शेतीतून करोडो रुपये कसे कमवायचे त्यामुळे कदाचित त्या प्रोटोकॉल विसरल्या असतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या अपमानाचे समर्थन त्या करत असतील. परंतु ते समर्थन करण्याआधी आपण वांग्याच्या शेतीमधून करोडो रुपये कसे कमावले, हे एकदा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगा. आणि हा फॉर्म्युला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिला, तर शेतकऱ्यांचे भले होईल, असे श्री. बन यांनी सुनावले.
