मंडणगड :- देव्हारे पंचक्रोशीत पारंपरिक दहीहंडी उत्सवाचा थरार यंदा शिगेला पोहोचला शिवसेना तालुका मंडणगड यांच्यावतीने सालाबादप्रमाणे आयोजीत करण्यात आलेल्या दहीहांडी चे कार्यक्रमात परिसरातील सुमारे चाळीस गावांमधील महिला व स्त्री गोविंदा पथकांनी या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. डीजेच्या कर्णकर्शक आवाजाला छेद देत खालुबाजा आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर ‘गोविंदा आला रे आला चा फेर धरत पुरुष महिला मुली युवक गोविंदा पथके उत्साहाने सहभागी झाली होती व सर्वांनी मानवी मनोरे रचत सालामी दिली. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि गोविंदांच्या जल्लोषामुळे देव्हारे पंचक्रोशीतील वातावरण भक्तिमय व उत्साहपूर्ण बनले होते. विशेष म्हणजे, महिला व स्त्री गोविंदा पथकांचा मोठ्या प्रमाणातील सहभाग हा यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरला. विविध गावांतील पथकांनी पारंपरिक पद्धतीने फेर धरत उत्सवाचा आनंद लुटला. पंचक्रोशीतील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पारंपरिक दहीहंडी उत्सवाचा आनंद घेतला.

देव्हारे पंचक्रोशीत जपल्या जाणाऱ्या या पारंपरिक दहीहंडी उत्सवाने ग्रामीण संस्कृती, परंपरा आणि महिला शक्तीचे दर्शन घडविले. या निमीत्ताने आयोजीत कार्यक्रमास रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. अस्मिता केंद्रे, सभापती प्रणाली चिले शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसळकर, उपसभापती दीपक मालुसरे, पंचायत समिती सदस्य अनिल रटाटे, सौ. दिप्ती घडशी, माजी सभापती अनंत लाखण, अमिता शिंदे, उद्योजक संदेश चिले, सचिव सिध्देश देशपांडे, युवा सेना तालुकाध्यक्ष विकास पवार, विभाग प्रमुख संजय शेडगे, इरफान बुरोंडकर, संजीव येसावरे, जितेंद्र दवंडे, दीपक घोसाळकर, वसीम चिपोलकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे औचीत्यसाधून जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार घोषीत झालेले प्राथमीक शिक्षक निलेश लोखंडे यांचा जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा सौ. अस्मिता केंद्रे यांच्याहस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

उत्सवात सहभागी होताना वास्तवाचे भान

गोठे गावातील गोविंदा पथकाने उत्सवात सहभागी होऊन पाच थराची सर्वात उंच मनोरा रचला या पथकाचे गोविंदाने म्हाप्रळ आंबेत पुल कोसळण्या आधी बांधा असा संदेश देणारा फलक हातात धरुन जनजागृती केली.