लांजा : संसदेच्या आवारात पवित्र साधू वेशाचा गैरवापर करून कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांच्या विरोधात सातारा जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या कृत्याचा निषेध करण्यासाठी ‘अखिल भारत हिंदू महासभा’ व ‘समस्त हिंदुत्ववादी संघटना, सातारा’ यांच्या वतीने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांना निवेदन दिल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात निवेदन देण्यात येत आहेत.त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे असे अखिल भारत हिंदू महासभा व हिंदू संघटना यांनी जोर धरला आहे.यावेळी हिंदू महासभेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनराज जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे खासदार पप्पू यादव यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीआहे.असेनिवेदनात म्हटले आहे.
.नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान खासदार पप्पू यादव यांनी पवित्र भगवा वेश आणि साधूचा पोशाख परिधान करून एक निंदनीय कृत्य केले. राजकीय स्वार्थासाठी त्यांनी संपूर्ण साधू समाजाला ‘चोर’ आणि ‘लुटारू’ म्हणून हिणवले. इतकेच नव्हे तर, हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचा फोटो जमिनीवर ठेवून त्यांचा घोर अवमान केला. भगवा रंग हा त्याग आणि सनातनी संस्कृतीचे दैदिप्यमान प्रतीक असताना, लोकशाहीच्या पवित्र मंदिरात लोकप्रतिनिधीकडून अशी स्टंटबाजी होणे अत्यंत लज्जास्पद आहे.
तीव्र आंदोलनाचा इशारा
या कृत्यामुळे संपूर्ण देशातील आणि सातारा जिल्ह्यातील हिंदू समाज, संत आणि कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र दुखावल्या गेल्या आहेत. “प्रभू रामांचा आणि भगव्याचा हा अपमान आम्हा सनातनी नागरिकांच्या सहनशीलतेच्या पलीकडचा आहे.असे अधिवक्ता दत्तात्रय आबाजी सणस यांनी आपला संताप व्यक्त केला.
प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून खासदार पप्पू यादव यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याबद्दल कडक कायदेशीर कलमांखाली गुन्हा (FIR) दाखल करावा, अशी आग्रहाची मागणी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच, जर यावर त्वरित कारवाई झाली नाही, तर अखिल भारत हिंदू महासभा व समस्त हिंदुत्ववादी संघटना संपूर्ण हिंदू समाजाला सोबत घेऊन साताऱ्यात रस्त्यावर उतरून तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन करेल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
