चिपळूण : निकृष्ट रस्ते, अर्धवट वॉकिंग ट्रॅक, काविळतळी येथील ६५ लाख रुपये खर्चून उभारलेल्या फुलपाखरू गार्डनची दुरवस्था, बंद पडलेली कचरा प्रकल्पातील मशिनरी, पाणी गळती, अपुरी नालेसफाई, डास आणि भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, तसेच वर्षानुवर्षे बंद असलेले मटण-मच्छी मार्केट आणि अनियोजित भाजी विक्री या गंभीर नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाने चिपळूण नगरपरिषदेला धारेवर धरले.

शहराध्यक्ष समीर देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषद प्रशासनाला निवेदन दिले. मुख्याधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत बांधकाम अभियंता दिपक निंबायकर, विनायक सावंत व बापू साडविलकर यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक फैसल कासकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेविका नसरीन खडस हे चर्चेत सहभागी झाले होते. नगरपालिकेच्या वतीने समन्वय साधत फैसल कासकर यांनी चर्चेत महत्वाची भूमिका बजावली आणि नागरी प्रश्नांवर सकारात्मक चर्चा घडवून आणली.

६५ लाखांचे गार्डन, वॉकिंग ट्रॅक आणि मैदानही अर्धवटच – अविनाश केळसकर
तालुकाध्यक्ष अविनाश केळसकर यांनी काविळतळी प्रकल्पावर सडकून टीका केली. केवळ ६५ लाखांचे फुलपाखरू गार्डनच नव्हे, तर त्यासोबतचा वॉकिंग ट्रॅक आणि खेळाचे मैदान देखील अर्धवट अवस्थेत आहे. खेळाचे मैदान अद्याप तयार झालेले नाही, कंपाऊंड वॉल पूर्ण झालेली नाही आणि संपूर्ण प्रभागाचे काम दुर्लक्षित आहे. नागरिकांच्या करातून निधी खर्च करूनही सुविधा वापरता येत नसेल तर हा निधीचा अपव्यय असल्याचा आरोप त्यांनी केला.

कचरा प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करणार
कचरा प्रकल्पातील कोट्यवधींची मशिनरी बंद का आहे, तिच्या देखभालीवर किती खर्च झाला, याची माहिती देण्याची मागणी पक्षाने केली. केवळ कागदोपत्री माहिती नको, तर संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष प्रकल्पाची पाहणी करून जाब विचारणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

“नसबंदी करूनही कुत्रे वाढलेच कसे?” – समीर देसाई
भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर शहराध्यक्ष समीर देसाई यांनी थेट सवाल केला. “प्रशासनाने ABC कार्यक्रमांतर्गत नसबंदी केल्याचे सांगितले, मग शहरात कुत्र्यांची संख्या वाढलीच कशी? किती कुत्र्यांची नसबंदी झाली, किती खर्च झाला, याची अधिकृत आकडेवारी द्या,” अशी मागणी त्यांनी केली. कागदोपत्री आकडे नकोत, प्रत्यक्ष कामाची खातरजमा झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

जुन्या परवानग्या आणि रोड वायडनिंगचा पेच – कबीर काद्री
माजी नगरसेवक कबीर काद्री यांनी रोड वायडनिंगचा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. “जुन्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिकृत बांधकाम परवानग्या असताना, त्याच ठिकाणी रस्ता रुंदीकरण कसे करणार? यावर प्रशासनाचे स्पष्ट धोरण काय?” असा सवाल त्यांनी केला.

“आमच्या संयमाचा गैरसमज नको” – शिरीषभाऊ काटकर
ज्येष्ठ नेते शिरीषभाऊ काटकर म्हणाले, “आम्ही विकासासाठी सहकार्य करायला आलो आहोत. पण आम्ही शांतपणे चर्चा करतोय याचा अर्थ दुर्लक्ष करावे असा नाही. आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नका.”

“अपघात झाल्यावरच जाग येणार का?” – सतीश आप्पा खेडेकर
सतीशआप्पा खेडेकर यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेवर टीका करताना सांगितले की, अपघातानंतरच डागडुजी केली जाते. नागरिकांच्या तक्रारीनंतर नियमित दुरुस्ती का होत नाही, असा सवाल त्यांनी केला. खड्डे बुजवणे, निकृष्ट कामांची चौकशी आणि पाइपलाइन गळतीमुळे वाया जाणारे पाणी व खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली.

मटण-मच्छी आणि भाजी मार्केटचा प्रश्न ऐरणीवर
वर्षानुवर्षे बंद असलेल्या मटण-मच्छी मार्केटमुळे शहरात विखुरलेल्या विक्रीमुळे दुर्गंधी आणि अस्वच्छता वाढल्याचे सांगण्यात आले. शहराच्या विस्तारानुसार पाणी, सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापनासह एक-दोन नियोजित मार्केट विकसित करण्याची आणि अधिकृत भाजी मार्केट उभारण्याची मागणी करण्यात आली.

गोवळकोट रोड व गांद्यारेश्वर रोडच्या खड्ड्यांवर रईस अल्वी,रुक्सार अल्वी व दीपा कोलतेकर आक्रमक
गोवळकोट रोड व गांधारेश्वर रोडवरील खड्ड्यांचा मुद्दा अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रईस भाई अल्वी, रुक्सार अल्वी आणि शहर महिला उपाध्यक्ष दीपा कोलतेकर यांनी आक्रमकपणे मांडला. या दोन्ही रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांचे व वाहनांचे प्रचंड नुकसान होत आहे. रस्त्याची अवस्था इतकी बिकट आहे की नगरपरिषदेची कचरा घंटागाडी देखील व्यवस्थित उभी राहू शकत नाही, त्यामुळे नागरिकांना कचरा देणेही कठीण झाले आहे.

डासांच्या प्रादुर्भावावर राधिका तटकरे यांची मागणी
यावेळी राधिका तटकरे यांनी वाढत्या डासांच्या प्रादुर्भावाचा मुद्दा उपस्थित केला. पावसाळ्यात धुर फवारणी शक्य नसली तरी, पावडरची फवारणी करून नगरपालिकेने डास प्रतिबंधक कारवाई तातडीने करावी, अशी मागणी त्यांनी केली.

१५ दिवसांत आढावा, अन्यथा जनआंदोलन

या सर्व मुद्द्यांवर केलेल्या कार्यवाहीचा आढावा पुढील १५ दिवसांत मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतला जाणार आहे. ठोस कार्यवाही न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन धडक मोर्चा आणि तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.

“चिपळूणकरांच्या कराचा पैसा जनतेसाठी खर्च होत असेल, तर सुविधा जनतेला मिळायलाच हव्यात,” अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.

उपस्थित मान्यवर: या बैठकीस ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक शिरीषभाऊ काटकर, ज्येष्ठ नेते सतीशआप्पा खेडेकर,जिल्हा उपाध्यक्ष दत्ता शेठ पवार, महिला जिल्हाध्यक्ष दीपिका कोतवडेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सीमाताई चाळके , युवक जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय केदारी, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष रईस अल्वी, चिपळूण तालुकाध्यक्ष अविनाश केळसकर, तालुका उपाध्यक्ष मनोहर खेडेकर, महिला तालुकाध्यक्ष आरुता आडविलकर, नगरसेवक नसरीन खडस,महिला जिल्हा सरचिटणीस नसीमा सय्यद, शहराध्यक्ष समीर देसाई, महिला शहर अध्यक्ष रुक्सार अल्वी,माजी नगरसेवक संजय तांबडे, माजी नगरसेवक कबीर काद्री, शहर उपाध्यक्ष रुपेश पालशेतकर , शहर उपाध्यक्ष सतेंद्र सिंग लोहिया, इम्तियाज मुकादम,शहर महिला उपाध्यक्ष दीपा कोलतेकर, सोनिया लोहिया, शफी म्हातरनाईक, राधिका तटकरे,सुजाता व्यवहारे आणि संतोष नरळकर उपस्थित होते.