खोपोली : रायगडच्या खोपोली नगर परिषदेच्या विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासकीय आणि आर्थिक अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप भाजपच्या नगरसेविका सानिया मोहसीन शेख यांनी केलाय . या कथित घोटाळ्याची तक्रार सानिया शेख यांनी राज्याचे मुख्यमंत्री, कोकण विभागीय आयुक्त, नगर परिषद प्रशासकीय संचालनालय, अल्पसंख्यांक विभागाकडे रीतसर तक्रारी देऊन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर व फोजदारी कारवाई करण्याची मागणी केलीये . नगरसेविका सानिया शेख यांनी निविदा प्रक्रिया, कार्यादेश, निधी मंजुरीपासून विकासकामांच्या गुणवत्तेपर्यंत अनेक मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत .
खोपोली नगरपरिषदेत विकासकामांच्या नावाखाली तब्बल १०० कोटींच्या घोटाळ्याचा संशय त्यांनी व्यक्त केला असून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलीय. या प्रकरणात सुशोभीकरण व विकासाच्या नावाखाली लाखो रुपयांचे बिल अदा झाल्याचा आरोप असून कागद पत्रातील तारखा, तपासणी अहवाल, बिल प्रक्रियेबाबत आक्षेप नोंदविण्यात आल्याची बाब सानिया शेख यांनी समोर आणलीय. तर कराडो रुपयांच्या निविदा, कार्यालीन टिप्पणी व कार्यादेशांवर मुख्याधिकाऱ्यांऐवजी वर्ग-३ च्या कनिष्ठ अभियंते व लिपिकांच्या सह्या घेऊन नियमबाह्य पद्धतीने कामे वाटप करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप सानिया शेख यांनी केलाये .
कामाचे देयक काढण्यासाठी पुणे येथील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या नावाने बनावट तपासणी अहवाल तयार करून लाखो रुपयांचे बिल अदा केल्याचा त्यांचा आरोप आहे. टाटा पॉवर व रेल्वेची परवानगी नसताना, तसेच माननीय उच्च न्यायालयाची स्थगिती असतानाही बेकायदेशीर बांधकाम पुढे का रेटण्यात आले? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते मोहसीन शेख यांनी उपस्थित केलाय.
दरम्यान, प्रभाग क्रमांक ६ मधील उर्दू शाळेसमोरील मैदानावर प्रस्तावित क्रिकेट टर्फ आणि लोखंडी स्ट्रक्चरच्या कामावरूनही प्रश्न उपस्थित केलाये . या कामामुळे विद्यार्थी आणि खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा दावा सानिया शेख यांनी केला आहे. सुमारे 73 लाख रुपयांच्या क्रिकेट टर्फच्या कामासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाये .
शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ करणाऱ्या संबंधित मुख्याधिकारी व जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची व फौजदारी कारवाई करावी, अशी ठाम मागणी नगरसेविका सानिया शेख यांनी केलीये. यावर प्रशासन स्थरावर आता काय कारवाई होतेये याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेये .