मंडणगड : मंडणगड तालुक्यातील नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला अखेर प्रतिसाद मिळत असून, राज्याचे मंत्री तथा नामदार श्री. योगेश कदम यांच्या विशेष प्रयत्नातून मंडणगड बसस्थानकाच्या नवीन इमारती करिता पाच कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. या इमारतीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा व तात्पुरत्या शेडचे उद्घाटन आज, गुरुवार दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
मंडणगड बसस्थानकाच्या नवीन व सुसज्ज इमारतीच्या कामामुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून, तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनेही या प्रकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नवीन बसस्थानकाच्या उभारणीदरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी तात्पुरत्या शेडची व्यवस्था करण्यात आली असून त्याचेही उद्घाटन यावेळी करण्यात येणार आहे.
मंडणगडच्या सुविधायुक्त व आधुनिक आगाराची उभारणी करण्यासाठी मंत्री योगेश कदम यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमास शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी तसेच सर्व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर यांनी आयोजकांच्या वतीने केलेआहे. मंडणगड बसस्थानक येथे सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार असून, प्रवासी व नागरिकांचेही या कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे.