मुंबई : वैश्यवाणी समाजाच्या हक्काच्या OBC लाभांसाठी आमदार प्रमोद जठार यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. शासनाने यासंदर्भात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे वैश्यवाणी समाजातील विद्यार्थी, युवक तसेच पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासनाच्या निर्णयानुसार हिंदू-वाणी, हिंदू-वैश्य आणि हिंदू-वैश्यवाणी या तीनही जाती वैश्यवाणी या जातीत समाविष्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच उपलब्ध जुन्या दस्तऐवजांमध्ये संबंधित नोंदी आढळल्यास पात्र व्यक्तींना वैश्यवाणी जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.

या निर्णयामुळे वैश्यवाणी समाजातील पात्र लाभार्थ्यांना शिक्षण, रोजगार आणि शासनाच्या विविध OBC सवलती व योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल महायुती सरकारचे हार्दिक अभिनंदन करताना वैश्यवाणी OBC कृती समितीचे अध्यक्ष सुनील खाडये यांनी आमदार प्रमोद जठार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे विशेष कौतुक केले.
“वैश्यवाणी समाजाच्या हक्काचे OBC लाभ मिळवून देण्यासाठी आमदार प्रमोद जठार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. शासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे समाजातील विद्यार्थी, युवक आणि पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल महायुती सरकारचे हार्दिक अभिनंदन असून, वैश्य समाजासाठी कायमस्वरूपी सुरू असलेल्या पाठपुराव्याबद्दल आमदार प्रमोद जठार यांचे मनःपूर्वक आभार.”