मुंबई : मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी गृहराज्यमंत्री मा. ना. योगेश कदम यांची मंत्रालयात भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.यावेळी मुंबईतील महाविद्यालयीन युवकांना लक्ष्य करून वाढत असलेल्या नशेखोरीच्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली.

विशेषतः गोरेगाव येथील नेस्को परिसरातील ड्रग्ज पार्टी प्रकरण, विक्रोळी परिसरातील ड्रग्ज माफियांवर झालेल्या कारवाया, तसेच ओव्हरडोसच्या घटनांमुळे तरुणांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. मुंबईसारख्या महानगरात तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवणे ही काळाची गरज असल्याचे ॲड. मातेले यांनी अधोरेखित केले. “ड्रगमुक्त मुंबई” हा केवळ घोषवाक्य नसून, एक व्यापक सामाजिक चळवळ म्हणून राबविणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.