मुंबई : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष देशभर पोहोचविला आहे. महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट आहेत. राज्याबाहेर मात्र गटबाजी नाही. देशभरात 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशात मी रिपब्लिकन पक्ष पोहोचविला असून तिथे इतर कोणतेही रिपब्लिकन गट नाहीत.त्यामुळे एकच रिपब्लिकन पक्ष एकसंघपणे मजबूत उभा रहावा यासाठी रोज नवे गट स्थापन करणे बंद केले पाहिजे.
नवे रिपब्लिक गट स्थापन करण्यापेक्षा एकाच रिपब्लिकन पक्षात आपले छोटे मोठे गट विसर्जित करून व्यापक मजबूत एकसंघ रिपब्लिकन पक्ष उभा केला पाहिजे असे आपण आवाहन केल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात समाजातून प्रतिसाद मिळत आहे.रिपब्लिकन सेने चे मुंबई प्रदेश अध्यक्ष प्रकाश खंडागळे यांनी आज त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह माझ्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केल्याची अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली.
यापूर्वी आपल्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मिलिंद सुर्वे यांनी आपला गट रिपब्लिकन पक्षात विलीन करून त्यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला आहे.राज्यात अनेक ठिकाणी छोट्या संघटना आणि रिपब्लिकन गट हे रिपब्लिकन पक्षाची एकजूट व्हावी या विचाराचे आहेत.एकसंघ रिपब्लिकन पक्षासाठी अनेक गट माझ्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात विलीन होण्यास मोठा प्रतिसाद देतील असा मला विश्वास आहे असे ना.रामदास आठवले यावेळी म्हणाले.
