चिपळूण : चिपळूण पंचायत समितीचे कार्यालय बहादूरशेख नाका येथे स्थलांतरित करण्याबाबत झालेल्या ठरावाचा पुनर्विचार करून सदर ठराव रद्द करण्यात यावा आणि विद्यमान ठिकाणीच बहुमजली, सुसज्ज व प्रशस्त प्रशासकीय इमारत उभारण्यात यावी , अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या तथा स्थायी समिती सदस्या शिवानी संदीप सावंत यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पंचायत समितीचे सभापती, उपसभापती तसेच गटविकास अधिकारी यांना पत्र देऊन ग्रामीण जनतेच्या सोयीचा विचार करण्याची विनंती केली आहे.
चिपळूण शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले पंचायत समितीचे विद्यमान कार्यालय हे वहाळ, मालदोली, रामपूर, सावर्डे, कोकरे जिल्हा परिषद गटांसह संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण जनतेच्या प्रशासकीय कामकाजाचे महत्त्वाचे केंद्र आहे.ग्रामीण भागातून विविध शासकीय कामांसाठी चिपळूण शहरात येणाऱ्या नागरिकांना बसस्थानकापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर पंचायत समितीचे कार्यालय उपलब्ध होते. त्यामुळे शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी हे ठिकाण अत्यंत सोयीचे आहे.
विशेष म्हणजे विद्यमान पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरातच तहसील कार्यालय, सेतू कार्यालय, न्यायालय, चिपळूण पोलीस ठाणे, प्रांत कार्यालय , भूमिअधिलेख कार्यालय तसेच राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित कार्यालये आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना एकाच परिसरात विविध शासकीय कामे पूर्ण करता येतात. पंचायत समिती कार्यालय बहादूरशेख नाका येथे स्थलांतरित झाल्यास या कार्यालयांमध्ये ये-जा करण्यासाठी नागरिकांना अतिरिक्त अंतर कापावे लागेल. परिणामी प्रवासाचा वेळ, वाहनखर्च आणि आर्थिक भार वाढून ग्रामीण जनतेला अतिरिक्त त्रास सहन करावा लागू शकतो.
पंचायत समितीची जुनी इमारत जीर्ण झाल्याने नवीन इमारतीची गरज निश्चितच आहे; मात्र त्यासाठी स्थलांतर हाच एकमेव पर्याय नसावा, अशी भूमिका शिवानी सावंत यांनी मांडली आहे.विद्यमान जागेवरील जुन्या इमारतींचे नियोजनबद्ध पुनर्बांधकाम करून त्याच ठिकाणी बहुमजली व आधुनिक प्रशासकीय वास्तू उभारल्यास पंचायत समितीचे सर्व विभाग एका छताखाली आणणे शक्य होईल आणि नागरिकांची सध्याची सोयही कायम राहील.
ग्रामीण जनतेच्या सोयीचा, वेळेचा आणि आर्थिक हिताचा विचार करूनच पंचायत समितीच्या भविष्यातील प्रशासकीय व्यवस्थेचे नियोजन होणे आवश्यक आहे.त्यामुळे बहादूरशेख नाका येथे स्थलांतर करण्याचा ठराव पुनर्विचारात घेऊन रद्द करावा आणि विद्यमान ठिकाणीच बहुमजली, सुसज्ज व प्रशस्त प्रशासकीय इमारत उभारावी, अशी ठाम मागणी शिवानी सावंत यांनी केली आहे.