मुंबई : चालू हंगामात पावसाने मारलेल्या दांडीमुळे विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील खरीप पिके पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. पावसाअभावी शेतातील पिके डोळ्यांदेखत वाळताना पाहून बळीराजा आर्थिक व मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचला आहे. या अभूतपूर्व संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा आणि बाधित शेतकऱ्यांना भरघोष आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात अनिल देशमुख यांनी राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या भीषण परिस्थितीचे वास्तव मांडले आहे. पावसाच्या तुटवड्यामुळे नागपूर व अमरावती जिल्ह्यातील संत्रा आणि मोसंबीच्या बागांना प्रचंड फटका बसला असून मोठ्या प्रमाणावर फळगळ होत आहे. कापूस, सोयाबीन आणि तूर ही प्रमुख पिके शेतातच वाळू लागली आहेत. सोयाबीन पीक शेंगा भरण्याच्या संवेदनशील टप्प्यावर असताना पाऊस गायब झाल्यामुळे उत्पादनात प्रचंड घट होण्याची भीती निर्माण झाली आहे.
दुसरीकडे, धान उत्पादक पट्ट्यात धानाचे पेरे करपून गेले असून उर्वरित पिकावर ‘खोडकिडा’ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने धान पीक हातातून जाण्याच्या मार्गावर आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने आगामी रब्बी हंगामाबाबतही शेतकरी गंभीर चिंतेत सापडला आहे, असे अनिल देशमुख यांनी निदर्शनास आणून दिले.
पावसाच्या तुटवड्यामुळे झालेल्या पीक नुकसानीचे प्रशासनामार्फत तात्काळ व वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. प्रभावित भागात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी भरघोष सानुग्रह अनुदान देण्यात यावे. संत्रा व मोसंबीच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या फळगळीपोटी फळबागधारकांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे. धान पिकावरील ‘खोडकिडा’ व इतर रोगांच्या नियंत्रणासाठी कृषी विभागामार्फत मोफत मार्गदर्शन आणि औषध फवारणीसाठी आर्थिक मदत पुरवण्यात यावी. पीक विम्याच्या अटी शिथिल करून सर्व बाधित शेतकऱ्यांना कोणतीही तांत्रिक अडचण न लावता त्वरित पीक विम्याची भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणीही अनिल देशमुख यांनी निवेदनातुन केली आहे.