दापोली : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, बँकेच्या सभासद असलेल्या सहकारी संस्थांकडून मतदानाचा अधिकार निश्चित करण्यासाठीचे ठराव सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) कार्यालयात सादर करण्याची लगबग सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दापोलीतील सहाय्यक निबंधक कार्यालयात एका विकास संस्थेच्या मतदान प्रतिनिधीबाबतच्या ठरावावरून अध्यक्ष आणि महिला सचिव यांच्यात झालेल्या चर्चेनंतर संबंधित सचिवांना टेन्शन आले व कार्यालयाबाहेर पडत असतानाच त्यांना चक्कर येऊन त्या बेशुद्ध पडल्याची घटना घडली.
कार्यालयात उपस्थित असलेल्या अन्य सहकारी संस्थांच्या सचिवांनी त्यांना तातडीने दापोलीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती सध्या सुधारत असल्याचे सांगण्यात येते.
मतदान प्रतिनिधी निश्चित करण्यासाठी ठराव
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद असलेल्या सहकारी संस्थांना बँकेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार असतो. संस्थेकडून एका संचालकाला हा मतदानाचा अधिकार देण्यात येतो. त्यासाठी संस्थेच्या संचालक मंडळाच्या सभेत मतदानाचा अधिकार कोणत्या संचालकाला द्यायचा, याबाबत निर्णय घेऊन तसा ठराव करून संस्थेच्या इतिवृत्त वहीत नोंदविला जातो.
त्यानंतर या ठरावाची प्रत सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) यांच्या कार्यालयात सादर केली जाते. कार्यालयातील अधिकारी इतिवृत्त वहीत नोंदविलेला ठराव आणि सादर करण्यात आलेल्या ठरावाच्या प्रतीतील मजकूर एकसारखा आहे की नाही, याची पडताळणी करतात.
नाव बदलण्यावरून निर्माण झाला पेच
संबंधित विकास संस्थेच्या संचालक मंडळाच्या सभेत एका संचालकाला मतदानाचा अधिकार देण्याचा ठराव करण्यात आला होता. मात्र, संस्थेच्या अध्यक्षांना या ठरावातील संचालकाऐवजी दुसऱ्या संचालकाला मतदानाचा अधिकार द्यायचा होता. त्यामुळे अध्यक्षांनी आधी झालेल्या ठरावावर अध्यक्ष म्हणून स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याचे समजते.
दरम्यान, अध्यक्षांनी सांगितलेल्या दुसऱ्या संचालकाचे नाव आधी झालेल्या ठरावात टाकण्यास सचिवांनी नकार दिला. संचालक मंडळाच्या सभेत झालेला ठराव बदलणे योग्य नसल्याची भूमिका सचिवानी होती. यावरून अध्यक्ष आणि सचिव यांच्यात वाद झाला. यामुळे संबंधित महिला सचिवांना टेन्शन आले. त्या सहाय्यक निबंधक कार्यालयातून बाहेर पडत असतानाच त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या बेशुद्ध पडल्या. त्यानंतर उपस्थित सचिवांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
ज्येष्ठ सहकार नेत्याच्या सल्ल्यानंतर तोडगा
या प्रकाराची दापोलीतील सहकार क्षेत्रात चर्चा सुरू असतानाच सहकार क्षेत्रातील एका ज्येष्ठ नेत्याने संबंधित अध्यक्षांना या प्रकरणावर तोडगा सुचविल्याचे समजते. मतदानाचा अधिकार दुसऱ्या संचालकाला द्यायचा असल्यास संस्थेची पुन्हा सभा घेऊन बहुमताने तसा ठराव करावा लागेल. मात्र हा ठराव देण्यासाठी केवळ दोनच दिवस उरलेले असल्याने संस्थेची पुन्हा सभा बोलावून त्यात ठराव करणे शक्य होणार नसल्याने संबंधित अध्यक्षांनी यापूर्वी झालेला ठराव मान्य करून इतिवृत्तावर स्वाक्षरी करण्यास सहमती दर्शविली आहे.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांमधील मतदान प्रतिनिधी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच घडलेल्या या प्रकारामुळे दापोलीतील सहकार क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.