चिपळूण (सुनील साळवी) : गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असून लाखोंच्या संख्येने तळकोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या स्वागतासाठी चिपळूणचे प्रशासन सज्ज झाले आहे. यंदा वाहतूककोंडी टाळण्यासाठी बहादुरशेख परिसरात तब्बल १०० स्वयंसेवक नेमण्यात येणार आहेत. त्याशिवाय हायवेवर ठिकठिकाणी मदत केंद्रेही उभारली जात आहेत. यावर्षी चिपळूण भागातून जाताना चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल असे प्रशासनाने नियोजन केले आहे.

गणेशोत्सवाला सोमवार दि. 14 सप्टेंबर पासून प्रारंभ होत आहे. उत्सवाच्या तयारीसाठी चाकरमानी तीन चार दिवस आधीच मिळेल त्या वाहनाने कोकणात दाखल होतात. दरवर्षी रेल्वे, एसटी बसेस, खासगी वाहने आणि प्रवासी गाड्या या माध्यमातून ३० ते ४० लाख चाकरमानी कोकणात सण साजरा करायला येतात. त्यापैकी रेल्वेतून येणाऱ्या प्रवाशांची संख्या ही केवळ तीन लाख आहे तर उर्वरित सर्व प्रवासी हे महामार्गावरूनच वाहनातून येणार आहेत. यंदा एसटी महामंडळाने कोकणात येण्यासाठी ५ हजारांपेक्षा जास्त गाड्या उपलब्ध केल्या आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही २९०० गाड्या मोफत सोडणार आहेत.

त्याशिवाय मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून ५ मोदी रेल्वे एक्सप्रेस आणि लक्झरी बसेसही सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे महामार्गावरून येणाऱ्या चाकरमान्यांची यंदा मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी नुकताच प्रत्यक्ष दौरा करून महामार्ग व सुरक्षेचा आढावा घेतला. चिपळूणमध्ये डीवायएसपी प्रकाश बेले व पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली.

बहादुरशेख नाक्यात १०० स्वयंसेवक नेमणार –
डीवायएसपी श्री. प्रकाश बेले यांनी दैनिक सागरला माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या वर्षी बहादुरशेख येथून केवळ एक लेन सुरू होती. यंदा दोन लेन सुरू असणार आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी होणार नाही. बहादुरशेख नाक्यात कुंभार्ली घाटातून चिपळूणकडे येणारी वाहतूक, शिवाय चिपळूण येथून तळकोकणाकडे पुढे जाणारी वाहतूक, आणि घाटातून व मुंबईहून चिपळूणमार्गे गुहागरकडे जाणारी वाहतूक यांचे उत्तम नियोजन करण्यासाठी पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांची दरवर्षी नियुक्ती केली जाते. यावर्षीही पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांच्या बरोबरीनेच १०० स्वयंसेवक नियुक्त केले जाणार आहेत.

दि. ११, १२, १३ सप्टेंबर असे तीन दिवस हे स्वयंसेवक २४ तासांसाठी कार्यरत असणार आहेत. कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये, चाकरमान्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे, वाहनचालकांना काही मदत हवी असल्यास ती तात्काळ उपलब्ध व्हावी ही मुख्य जबाबदारी स्वयंसेवक पार पाडणार आहेत. विशेष म्हणजे त्यांना तीन दिवसांचे मानधनही देण्यात येणार आहे. हा खर्च महामार्ग विभागातर्फे केला जाणार आहे. त्याशिवाय सवतसडा, कळंबस्ते, बहादुरशेख आदी विविध ठिकाणी मदतकेंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. या मदतकेंद्रांमध्ये पोलीस कर्मचारी, तसेच आरोग्य आणि महसूल विभागाचे कर्मचारी तैनात असणार आहेत. बहादुरशेखपासून पागेपर्यंत स्वयंसेवक तैनात करण्याचाही विचार आहे. अशी सविस्तर माहिती डीवायएसपी श्री. बेले साहेब यांनी दिली.

उड्डाणपुलाखाली एसटी गाड्या थांबवून ठेवणार-
चिपळूणच्या मध्यवर्ती बसस्थानकात इंधन भरण्यासाठी येणाऱ्या गाड्यांची रांग बुरुमतळी भागात होत होती. ती टाळण्यासाठी उड्डाणपुलाखाली पार्किंगच्या जागेत इंधन भरण्यासाठी गाड्या थांबवून ठेवण्यात येणार आहेत. आणि या गाड्या पाच-पाचच्या संख्येने चिपळूण मध्यवर्ती स्थानकात सोडणार आहेत. चिपळूण बसस्थानक आणि उड्डाणपुलाखाली पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. या दोन्ही ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना वॉकीटॉकी दिला जाईल. पाच गाड्यांमध्ये इंधन भरल्यानंतर उड्डाणपुलाखालील थांबवून ठेवलेल्या पाच गाड्या इंधन भरण्यासाठी सोडण्यात येतील यामुळे, मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात एसटी गाड्यांची गर्दी होणार नाही आणि वाहतूक कोंडीही निर्माण होणार नाही. त्याचप्रमाणे शिवाजीनगर येथे सीएनजी भरण्यासाठी येणाऱ्या गाड्यांचेही असेच नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती श्री. बेले यांनी दिली.

परतीच्या ३०० गाड्या शिवाजीनगरमधून सुटणार-
चिपळूण मध्यवर्ती स्थानकात होणारी गर्दी लक्षात घेता सेवामार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. चिपळूण आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांनी दैनिक सागरला माहिती देताना सांगितले की, यावर्षी मुंबई, बोरिवली, ठाणे, कल्याण, भांडुप, डोंबिवली, नालासोपारा, चिंचवड, स्वारगेट, बदलापूर, पनवेल या मार्गावर जाणाऱ्या नियमित व जादा बसेस चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकाऐवजी शिवाजीनगर बसस्थानकातून सोडण्यात येणार आहेत. परतीच्या प्रवासासाठी तीनशे गाड्यांचे बुकिंग झाले आहे. अशी माहिती त्यांनी दिली