खेड : रत्नागिरी जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना फ्लेक्स, बॅनर, पोस्टर्स व होर्डिंग लावणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले असतानाही खेड शहरासह ग्रामीण भागात या आदेशाला हरताळ फासला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील तसेच प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा विनापरवाना फलक मोठ्या प्रमाणात झळकत असून, प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणाऱ्या फ्लेक्स, बॅनर, पोस्टर्स व होर्डिंगवर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचा परवाना क्रमांक, परवानगीचा कालावधी, मुद्रक व प्रकाशकाचे नाव-पत्ता तसेच इतर आवश्यक माहिती असलेला क्यूआर कोड ठळकपणे नमूद करणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित मुद्रक, प्रकाशक यांच्यासह फलकावर झळकणाऱ्या व्यक्तींचीही प्राथमिक चौकशी करून त्यांचा सहभाग आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र मालमत्तेचे विद्रूपीकरणास प्रतिबंध अधिनियम, १९९५ तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या अनुषंगाने हे आदेश देण्यात आले आहेत. विनापरवाना फलक आढळल्यास त्यावरील फोटो, नाव आणि इतर तपशील प्राथमिक तपासाचा महत्त्वाचा पुरावा मानला जाणार आहे. फलक कोणी तयार केला ? कोणी छापला ? कोणाच्या निर्देशाने तो लावण्यात आला ? आणि संबंधित व्यक्तीची संमती अथवा सहभाग होता का ? याचा तपास करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश आहेत.
खेडमध्ये आदेशाची अंमलबजावणी कधी ?
खेड शहरातील विविध भागांसह ग्रामीण परिसरातील रस्त्यांच्या दुतर्फा विविध राजकीय, सामाजिक, व्यावसायिक व शुभेच्छांचे फलक मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. यापैकी अनेक फलकांवर आवश्यक परवानगी क्रमांक अथवा क्यूआर कोडसह इतर अनिवार्य तपशील नसल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची खेडमध्ये प्रभावी अंमलबजावणी होत आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच नगरपरिषद व नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना आदेशाची तात्काळ व काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, खेड शहर व परिसरात सर्रास विनापरवाना फलक झळकत असताना प्रशासनाकडून कारवाई होताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने नेमके कोणते पाऊल उचलले आहे? आतापर्यंत किती फलकांवर कारवाई करण्यात आली? किती जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले? तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर पुढे कोणती कारवाई केली जाणार, याकडे आता खेडवासीयांचे लक्ष लागले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी कागदावरच राहणार की प्रत्यक्षात विनापरवाना फ्लेक्सविरोधात धडक कारवाई होणार ? हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.