लोटे : – खेड तालुक्यातील घाणेखुंट गवळी वाडी मधील तरुण विक्रम गजानन पवार यांनी आपल्या घरच्या गणपती समोर “एकजुटीचा शिमगोत्सव अर्थात घाणेखुंट शिमगोत्सव”या संकल्पने खाली आपल्या गावातीलच हिमोगोत्सवाचा हलता देखावा साखर करून संपूर्ण पंचक्रोशी चे लक्ष वेधून घेतले आहे.
त्याच्या गावात शिमगा या सणाच्या वेळी संपूर्ण गावातील ग्रामस्थ आपापसातील मतभेद विसरून एकत्र येतात आणि ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर सलग दहा दिवस एक एकजुटीने आणि आनंदाने हा उत्सव साजरा करतात. त्या उत्सवाचे हुबेहूब दर्शन त्याने या देखाव्यातून घडवले आहे. त्यामध्ये पेटलेली होळी, ग्रामदेवतेच्या मंदिराची प्रतिकृती, सहान, ढोल ताशे वाजवणारे वादक,गावातील ग्रामस्थ आणि मंदिराच्या पायऱ्यांवर बसून कौतुकाने पालखी नाचवतानाचे दृश्य पाहणारी लहान लहान मुले हे सर्व बारकावे त्याने या हलत्या देखाव्यामध्ये साकारले आहेत.
शिमगोत्सव हा कोकणच्या समृद्ध लोकपरंपरेचा आणि सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. रंग, ढोल-ताशांचा निनाद, पारंपरिक नृत्य, पालखी आणि ग्रामदेवतेच्या जयघोषाने शिमग्याचे दिवस उत्साहाने भरून जातात. मात्र या उत्सवाचे खरे सौंदर्य केवळ जल्लोषात नसून एकजुटीत आहे. आणि हिच एकजूट आपल्या गावातील शिमगोत्सवात पहायला मिळते असे तो अभिमानाने सांगतो.
गावातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण मतभेद बाजूला ठेवून उत्सवाच्या तयारीत सहभागी होतात. कोणी सजावटीची जबाबदारी घेतो, कोणी पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करतो, तर कोणी पाहुण्यांचे स्वागत करतो. प्रत्येकाच्या सहभागातून उत्सवाला एक वेगळीच ऊर्जा मिळते.शिमगोत्सव आपल्याला सांगतो की, एकीमध्येच खरी ताकद असते. जात, धर्म, आर्थिक परिस्थिती किंवा वैयक्तिक मतभेद यापलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र येणे हीच आपल्या लोकसंस्कृतीची खरी ओळख आहे. परंपरा जपताना नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे, हीदेखील आपली सामूहिक जबाबदारी आहे.म्हणूनच “एकजुटीचा शिमगोत्सव” म्हणजे केवळ सण नव्हे; तो बंधुभाव, सहकार्य, आनंद आणि सामाजिक ऐक्याचा उत्सव आहे. आपल्या गावाची आणि संस्कृतीची ही एकजूट अशीच कायम राहो, अशी प्रार्थना श्री गणेशाच्या चरणी विक्रम करतो.आपण सर्वांनी बाप्पा च्या दर्शनासाठी व हा देखावा पाहण्यासाठी यावे, असे आवाहन विक्रम पवार यांनी केले आहे.