लांजा : पावसाचे असमान वितरण, पावसातील खंड आणि त्याचा खरीप पिकांवर झालेला परिणाम लक्षात घेता लांजा तालुक्यातील सद्यस्थितीची तातडीने प्रशासकीय पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लांजा तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तालुकाप्रमुख श्री. युवराज हांदे यांच्या नेतृत्वाखाली लांजा तहसीलदारांना निवेदन साद करण्यात आले.
पावसावर अवलंबून असलेल्या भात, नाचणी व अन्य खरीप पिकांवर अनियमित पावसाचा परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ पर्जन्यमानाच्या आकडेवारीवर परिस्थितीचे मूल्यांकन न करता गावनिहाय पिकांची स्थिती, जमिनीतील ओलावा, जलस्रोतांची उपलब्धता, पर्जन्यखंड आणि प्रत्यक्ष पीकनुकसान यांची पाहणी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
प्रशासनाने महसूल, कृषी व संबंधित विभागांच्या माध्यमातून तातडीने पीकनुकसानीचे पंचनामे करावेत आणि शासनाच्या प्रचलित दुष्काळ निकषांनुसार तालुक्याचे मूल्यांकन करून परिस्थिती दुष्काळसदृश असल्याचे स्पष्ट झाल्यास दुष्काळग्रस्त तालुका घोषित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई, पीकविमा व अन्य सवलती, तर संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा व पाण्याचे नियोजन तातडीने करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी विभागप्रमुख विश्वास मांडवकर, राजेंद्र सुर्वे, शांताराम गुरव, सुभाष तावडे (उपविभाग प्रमुख), पंढरी गुरव, बाबा धावणे, दिनेश गुरव, विघ्नेश गुरव, संतोष लिंगायत यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.