मंडणगड : तालुक्यातील वेसवी येथे रात्रीच्या वेळी अंधारात संशयास्पदरीत्या दबा धरून बसलेल्या ४४ वर्षीय इसमाला बाणकोट सागरी पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई रविवार, १३ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ११.४० वाजण्याच्या सुमारास मोरे यांच्या टपरीच्या आडोशाला करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमई परमालिक प्रसाद (वय ४४, मूळ रा. देवगह, पोस्ट अरजी, तहसील बासी, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश; सध्या रा. बाणकोट, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) हा वेसवी येथील मोरे यांच्या टपरीच्या आडोशाला अंधारात संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने घाईघाईने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र, पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव व पत्ता सांगितला. रात्रीच्या वेळी सदर ठिकाणी थांबण्याचे कारण विचारले असता त्याने समाधानकारक उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

सूर्यास्त व सूर्योदयादरम्यान स्वतःचे अस्तित्व लपवून कोणताही दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयास्पद स्थितीत अंधारात दबा धरून बसल्याचा संशय असल्याने त्याच्याविरुद्ध बाणकोट सागरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस शिपाई समीर संपत गावडे यांनी फिर्याद दिली असून, गु. र. क्र. ३३/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे.