दापोलीः- गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात अत्यंत भक्तीमय वातावरणात दापोली तालुक्यामध्ये विविध गावात भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
दापोली तालुक्यातील विविध गावांमध्ये गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाची स्थापना केली होती. सुमारे दीड दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गावागावामध्ये टिपरी नृत्य, जाखडी नृत्य व भजन यांच्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. अनेक मुंबईवासीय हे आपापल्या गावामध्ये आले असल्याने काही महिने ओस पडलेली घरे पुन्हा गजबजून गेली आहेत. दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन होणार असल्याने या घरांमध्ये पाहुण्यांची वर्दळ वाढलेली पहावयास मिळाली होती. सायंकाळी उशिरा तालुक्यातील विविध गावांमध्ये पारंपारिक खालूबाजा च्या साथीने टाळ-मृदंगांच्या गजरात भक्तीमय वातावरणात गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षा लवकर या… या जयघोषात समुद्र किनारे, नदी, तलाव, विहीर यामध्ये दीड दिवसाच्या गणेशाचे भक्तीपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. दापोली नगरपंचायतीच्या वतीने स्टेट बँकसमोर व आसऱ्याचा पुल येथे गणेश विसर्जनाची तयारी करण्यात आली होती. शहरातील विविध भागांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त होता.
दापोलीत दीड दिवसाच्या गणपतीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन…
