सान्वी भुवडला ‘सेवा संकल्प’ अभियानातून श्रवणयंत्राची मदत
मंडणगड : देव्हारे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी सान्वी भुवड हिला भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी यांच्या वतीने ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत श्रवणयंत्र प्रदान करण्यात आले. जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या उपस्थितीत हा संवेदनशील आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम पार पडला.
श्रवणक्षमतेच्या अडचणीमुळे शिक्षण घेताना सान्वीला येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, शिक्षकांचे मार्गदर्शन, वर्गातील संवाद आणि अभ्यासक्रम अधिक सहजपणे समजावा, तसेच तिच्या शैक्षणिक वाटचालीला आत्मविश्वासाची साथ मिळावी, या उद्देशाने ही मदत करण्यात आली.
“मदत ही केवळ साधन देण्यापुरती मर्यादित नसून, एखाद्या विद्यार्थ्याच्या स्वप्नांना बळ देणारी असावी,” या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची समान संधी मिळावी, हा सकारात्मक सामाजिक संदेश देण्यात आला.
यावेळी बाणकोट सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आर. के. रशीदे, देव्हारे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र कापसे, प्राध्यापक अमित रसाळ, वैभव पाध्ये, योगेश कुमार केसरे, कुंडलिक यादव, प्रशांत उगले,विष्णू बडे यांच्यासह शिक्षकवर्ग व मान्यवर उपस्थित होते.
सान्वीच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि आत्मविश्वास, तसेच तिच्या शिक्षणाच्या वाटचालीला मिळालेली नवी श्रवणसाथ, हा या उपक्रमाचा खरा सामाजिक अर्थ ठरला.
फोटो ओळी सान्वी हिला श्रवण यंत्र वाटपाचे कार्यक्रमास उपस्थित मान्यवर
