खेड : तालुक्यातील दोन तरुण बेपत्ता झाल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम १४०(३) अन्वये अपहरणाचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. साहील बाबुराव शिर्के (वय २२) आणि सतीश बालाजी गोरे (वय २३) हे दोघेही बेपत्ता असून, त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
बहीरवली फाटा, सुसेरी नं. १, चौलवाडी परिसरातील साहील बाबुराव शिर्के हा १६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे २ वाजता घरातून बाहेर पडला. त्यानंतर तो अद्याप घरी परतलेला नाही. कुटुंबीयांनी नातेवाईक व परिचितांकडे चौकशी करून त्याचा शोध घेतला. मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही. याप्रकरणी साहीलची पत्नी दिक्षा सिद्धार्थ जाधव (वय २२) यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अज्ञात इसमाने साहीलचे अपहरण केले असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२४/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत खोपी येथील सतीश बालाजी गोरे (वय २३) हा १० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता मोटारसायकलवरून लोटे येथे जाण्यासाठी घरातून निघाला होता. त्यानंतर तो घरी परतला नाही. त्याच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद असल्याचे समोर आले. त्यानंतर कुटुंबीयांनी लोटे परिसर तसेच नातेवाईकांकडे त्याचा शोध घेतला. मात्र सतीशचा ठावठिकाणा लागला नाही. याप्रकरणी त्याचे वडील बाबू बालाजी गोरे (वय ४०) यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अज्ञात व्यक्तीने सतीशचे अपहरण केले असावे, अशी तक्रार देण्यात आली असून गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२५/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही प्रकरणांत आरोपी अज्ञात असून, खेड पोलीस बेपत्ता तरुणांचा शोध घेत आहेत. त्यांच्या बेपत्ता होण्यामागील नेमके कारण आणि परिस्थितीचा तपास सुरू आहे.