रायगड : महिलांना कौशल्याच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने ग्रुप ग्रामपंचायत वासांबे (मोहोपाडा) येथील ग्रामपंचायत सभागृहात ‘कौशल्य विकासातून आर्थिक स्वावलंबनाकडे’ या महिला कौशल्य विकास व आर्थिक साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सभागृहात मंगळवार दि.29 रोजी दुपारी करण्यात आले होते .अल्काइल अमाइन्स केमिकल्स लिमिटेड यांच्या सामाजिक दायित्व निधी (CSR) अंतर्गत २८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या प्रशिक्षणामध्ये वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील महिलांना शिवणकलेचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना स्वतःचे कौशल्य विकसित करून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करता याव्यात आणि कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात हातभार लावता यावा, यावर विशेष भर देण्यात आला.

प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित कार्यक्रमात प्रशिक्षणार्थी महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी महिलांचा उत्साह आणि सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.

अल्काइल अमाइन्स केमिकल्स लिमिटेडच्या CSR निधीतून ग्रामपंचायतीला आधुनिक शिलाई मशीन भेट देण्यात आल्या. त्यामुळे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना शिवणकलेचा प्रत्यक्ष व्यवसायासाठी उपयोग करून रोजगार व उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

यासोबतच ग्रामपंचायत हद्दीतील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीला घंटागाडी देखील सुपूर्द करण्यात आली. कौशल्य विकासासोबतच ग्रामविकास आणि स्वच्छतेला चालना देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवर, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी स्वागत केले
कार्यक्रमाला सरपंच उमाताई संदीप मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अल्काइल अमाइन्स केमिकल्स लिमिटेडच्या Sr. HR Manager ग्रिष्मा पटेल, HR Executive अर्चना माने, CSR Officer निकिता म्हात्रे आणि CSR Consultant रवी ओंकार यांच्यासह संबंधित अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

तसेच ग्रामपंचायतीच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या ग्रामपंचायत सदस्या रसिका राकेश खराडे,कविता मांडे,माया पाटील, स्वप्नाली मैदर्गीकर,संगीता भोईर, केदार भोईर यांचीही उपस्थिती होती.

या प्रशिक्षणामुळे महिलांना शिवणकलेच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार असून, स्वतःच्या कौशल्यावर उभे राहून कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात हातभार लावण्याची संधी मिळणार आहे.

महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास आणि आर्थिक स्वावलंबनाला चालना देणाऱ्या या उपक्रमामुळे वासांबे-मोहोपाडा परिसरातील महिलांना आत्मनिर्भरतेची नवी दिशा मिळणार आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.या संपूर्ण उपक्रमाला परिसरातील महिलांचा मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.