दापोली : प्रवाशांची मागणी, लोकप्रतिनिधींच्या सूचना आणि ग्रामपंचायतींसह विविध संस्था-मंडळांची निवेदने असतानाही दापोली आगाराकडून आवश्यक असलेल्या लांबपल्ल्याच्या बससेवा सुरू करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे मागणी नसलेल्या दापोली–सावंतवाडी मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली असताना, अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या पाजपंढरी–मुंबई तसेच भडवळे–नालासोपारा बससेवेकडे मात्र अद्याप दुर्लक्षच होत असल्याचे चित्र आहे.
पाजपंढरी–मुंबई बस सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीने निवेदन दिले आहे. तसेच विविध संस्था व मंडळांनीही या मागणीसाठी पाठपुरावा केला आहे. लोकप्रतिनिधींनीही संबंधित अधिकाऱ्यांना बस सुरू करण्याबाबत सूचना केल्या आहेत. तरी देखील पाजपंढरी – मुंबई बससेवा अजूनही चालू केलेली नाही. तसेच अशीच परिस्थिती भडवळे – नालासोपारा या बससेवेची केली आहे. ही बस सुरू झाल्यास परिसरातील सुमारे २५ ते ३० गावांतील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. मात्र, अद्याप या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही.
दरम्यान, दापोली आगारातून नव्याने बोरिवली, पुणे, ठाणे आणि मुंबई मार्गावरील काही फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. सकाळी ६ वाजताची बोरिवली, सकाळी ११ वाजता व दुपारी ३.३० वाजता पुणे-दापोली, सायंकाळी ५ वाजता ठाणे-दापोली तसेच रात्री ९:१५ व ९:३० वाजता बोरिवली-दापोली तर रात्री १० वाजता पुन्हा मुंबईमार्गे बोरिवली या मार्गावरील फेऱ्यांचा समावेश आहे. खेड-चिपळूण मार्गावर ई-शिवाईच्या फेऱ्याही वाढविण्यात आल्या आहेत.
मात्र, विजापूर, लातूर-नांदेड, बीड-आंबेजोगाई, सातारा, शिर्डी तसेच सकाळची जलद रत्नागिरी बससेवा या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. परिणामी खासगी ट्रॅव्हल्सचा व्यवसाय वाढत असून, त्यावरही संबंधित अधिकाऱ्यांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आहे. ‘प्रवासी राजा दिना’चे आयोजनही आता होत नसल्याने प्रवाशांच्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठच उरले नसल्याची भावना व्यक्त होत आहे.
पंचायत समितीच्या मासिक बैठकीत तसेच नुकत्याच झालेल्या आमसभेतही एसटी प्रशासनाच्या कारभारावर लोकप्रतिनिधींनी ताशेरे ओढले. दापोली आगारात सध्या विविध प्रकारच्या एकूण ८० बसेस उपलब्ध आहेत. यामध्ये १२ मीटरच्या १६ व ९ मीटरच्या ११ शिवाई, ५ जिजाऊ, १० लालपरी, ३ शिवशाही, ४ स्लीपर आणि साध्या ३१ बसेसचा समावेश आहे. एवढी बससंख्या उपलब्ध असतानाही मागणी असलेल्या मार्गांवर सेवा का वाढवली जात नाही, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.