बदलापूर : अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुकल्या स्वर्णाली सौरभ सकपाळ हिने लाठी-काठी या मर्दानी खेळात उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. स्वर्णाली ही न्यू इंग्लिश इंटरनॅशनल स्कूल, मोहपाडा, बदलापूर येथे ज्युनिअर केजीमध्ये शिक्षण घेत असून, ती गार्गी सोशल अकॅडमी येथे लाठी-काठीचे प्रशिक्षण घेत आहे.
स्वर्णालीला प्रशिक्षण प्रमुख श्री. संतोष दशरथ चव्हाण सर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. गेल्या चार महिन्यांपासून ती नियमितपणे लाठी-काठीचे प्रशिक्षण घेत आहे.
या अल्प कालावधीत स्वर्णालीने विविध कार्यक्रमांमध्ये आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे. भेंडीपाड्याचा चिंतामणी आगमन सोहळा, अंबरनाथ; श्री छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन, बदलापूर पश्चिम; आषाढी वारी विशेष कार्यक्रम, न्यू इंग्लिश स्कूल, बदलापूर पूर्व; तसेच लालबागचा राजा, परळचा महाराजा आणि परळचा लाडका लंबोदर विसर्जन सोहळा, लालबाग-परळ या विविध ठिकाणी तिने लाठी-काठीचे प्रात्यक्षिक सादर केले.
अवघ्या साडेतीन वर्षांच्या वयात मर्दानी खेळाची आवड जोपासत स्वर्णाली आत्मविश्वासाने आपली कला सादर करत आहे. तिच्या या कामगिरीचे पालक, शिक्षक, प्रशिक्षक तसेच परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
लहान वयातच पारंपरिक मर्दानी खेळाची आवड निर्माण करून स्वर्णालीने आपल्या कलेच्या माध्यमातून एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
साडेतीन वर्षांच्या स्वर्णालीची लाठी-काठीच्या मर्दानी खेळात उल्लेखनीय कामगिरी…
