देवरुख : शासनाच्या ऑनलाइन देयक सेवा नागरिकांपर्यंत अत्यंत जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचवून रत्नागिरी जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या ऐतिहासिक यशात मोलाचे योगदान देणारे संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार किशोर जोयशी यांचा रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
संगमेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या किशोर जोयशी यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवरील सेवा नागरिकांपर्यंत विनाविलंब आणि प्रभावीपणे पोहोचवील्या. त्यांच्या व अन्य पोलीस ठाण्यातील उत्कृष्ट कामगिरीमुळेच रत्नागिरी जिल्ह्याला राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाचा मान मिळवता आला.
या कर्तव्यदक्षतेची दखल घेत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जोयशी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.
“भविष्यातही आपण सर्वांनी अशाच प्रकारे निष्ठापूर्वक कामगिरी बजावून रत्नागिरी पोलीस दलाचा नावलौकिक अधिक उज्ज्वल कराल,” असा ठाम विश्वास याप्रसंगी पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केला.
जोयशी यांच्या या यशाबद्दल संगमेश्वर पोलीस ठाण्यासह संपूर्ण रत्नागिरी पोलीस दलातून आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आपले सरकार’ ऑनलाइन सेवेत उल्लेखनीय कामगिरीत पोलीस ठाण्यात अंमलदार किशोर जोशींचा गौरव…
