दापोली (सागर गोवळे):डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी महाविद्यालय, दापोलीच्या कृषी अभियांत्रिकी व वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमा (RAWE) अंतर्गत गुरववाडी येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ‘कृषी सखी’ आणि ‘कृषी स्नेही’ गटाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात “शेतीतील अभियांत्रिकी तंत्रज्ञान व मशरूम (अळिंबी) उत्पादन तंत्रज्ञान” या विषयावर परिसरातील ३० शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा, गुरववाडी (वनौषी तर्फे पंचनदी) येथे हा कार्यक्रम पार पडला. उपस्थितांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
अल्प कष्टात अधिक उत्पन्नासाठी आधुनिक यंत्रांचा वापर आवश्यक : डॉ. सचिन पाठक
पहिल्या सत्रात कृषी अभियांत्रिकी विभागाचे डॉ. सचिन व्ही. पाठक यांनी शेतीतील यांत्रिकीकरणाचे महत्त्व स्पष्ट केले. योग्य यंत्रांच्या वापरामुळे शेतीतील श्रम व वेळेची बचत होऊन उत्पादन खर्च कमी होतो, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या खालील उपकरणांची माहिती व वापर पटवून दिला:
वैभव विळा: भात व इतर पिकांच्या सुलभ कापणीसाठी.
अतुल व नूतन आंबा तोडणी यंत्र: उंच झाडांवरील फळे सुरक्षित तोडण्यासाठी.
अमर लोरॅन्थस कटर: झाडांवरील परजीवी वनस्पती काढण्यासाठी.
अंकुर दातेरी फावडे: जमीन खोदकाम व मशागतीसाठी.
पंकज पडलर व कोनो वीडर: भातशेतीत चिखलणी आणि तण नियंत्रणासाठी.
सुपारी सोलणी यंत्र व CAET काजू कटर: प्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त साधने.
पूरक व्यवसाय म्हणून मशरूम शेती उत्तम पर्याय : डॉ. एस. सी. रिठे
दुसऱ्या सत्रात वनस्पती रोगशास्त्र विभागाचे डॉ. एस. सी. रिठे यांनी मशरूम (अळिंबी) उत्पादन तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. त्यांनी सर्वप्रथम खाद्य, औषधी आणि विषारी मशरूममधील फरक स्पष्ट करून योग्य ओळखीचे महत्त्व अधोरेखित केले.
कमी जागेत आणि शेतातील टाकाऊ मालाचा वापर करून मशरूम शेती हा उत्तम पूरक व्यवसाय कसा ठरू शकतो, हे सांगताना त्यांनी कच्च्या मालाची निवड, निर्जंतुकीकरण, स्पॉनिंग, तापमान-आर्द्रता व्यवस्थापन आणि कापणी या १० महत्त्वाच्या टप्प्यांची सविस्तर माहिती दिली.
शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन केल्यामुळे ही कार्यशाळा अत्यंत संवादात्मक व माहितीपूर्ण ठरली. शेवटी प्रमुख मार्गदर्शक, कृषी अधिकारी, आयोजक आणि ग्रामस्थांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
गुरववाडीत कृषी अभियांत्रिकी व मशरूम शेती तंत्रज्ञानावर कार्यशाळा संपन्न…
