लोटे :- ( ज्ञानेश्वर रोकडे ) रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उद्योजक राजेश तिवारी यांच्या नावावर आणि त्यांच्या कंपनीशी संबंधित कागदपत्रांचा गैरवापर करून ४ कोटी ९९ लाख रुपयांचे कॅश क्रेडिट परस्पर कर्ज खाते तयार करून त्यात जमा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोटे येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेतून हे कर्ज तिवारी बायो फॉस्फेट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावावर जमा करण्यात आल्याचा दावा उद्योजक राजेश तिवारी यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या व्यवहारादरम्यान सुमारे १३ लाख रुपयांचे सर्व्हिस चार्जेस डेबिट झाल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. आपल्या कंपनीच्या नावावर एवढ्या मोठ्या रकमेचे कर्ज काढण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर राजेश तिवारी यांनी माध्यमांसमोर येत आपली मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे.
या संपूर्ण प्रकरणात बँकेच्या प्रक्रियेत नेमके काय घडले? आणि या व्यवहारामागे कोणाचा सहभाग आहे? याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
राजेश तिवारी यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन माध्यमांसमोर खुलासा केला आहे.
उद्योजक राजेश तिवारी यांच्या म्हणण्यानुसार, ते एच डी एफ सी बँक लोटे यांच्याकडे ‘ तिवारी बायो फॉस्फेट प्रा. ली. ‘ या त्यांच्या मालकीच्या कारखान्याच्या नावे चालू खाते उघडण्याकरिता गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा व कारखान्याचा संचालक आयुष तिवारी हा सुद्धा होता. मात्र बँकेचे व्यवस्थापक श्री निलेश पाटील यांनी आम्ही स्वतः तुमच्याकडे येतो आणि तुमचे फॉर्म भरून घेतो असे सांगितले. त्यानुसार ते स्वतः कारखान्यात आले त्यांच्यासोबत रविनाथ चव्हाण नमक एक महिला बँक कर्मचारी सुद्धा आल्या होत्या. त्यांनी चालू खात्याचे फॉर्म सांगून माझ्याकडून विविध कागदपत्रांवर सह्या घेतल्या आणि माझा मुलगा आयुष याच्याही सह्या घेतल्या. मात्र त्यांनी यावेळी हे कागदपत्र कॅश क्रेडिट साठी आहेत किंवा या कॅश क्रेडिटचा व्याजदर अथवा प्रक्रिया शुल्क याबद्दल कोणतीही माहिती आम्हाला दिली नाही. आम्ही केवळ चालू खाते उघडायचे आहे म्हणून सह्या केल्या आणि आमची फसवणूक झाली. आता प्रक्रिया शुल्कापोटी डेबिट झालेले तेरा लाख वीस हजार हे विनाकारण आमच्या कंपनीच्या नावावर कर्ज म्हणून राहिले आहे. मला या कर्जाची कोणत्याही प्रकारे गरज नव्हती आणि तशी मागणीही मी केली नाही असे असताना बँकेने तब्बल ४ कोटी ९९ लाख रुपयांचे कॅश क्रेडिट देऊन त्यातील १३ लाख २० हजार रुपये डेबिट केले आहेत,असा आरोप राजेश तिवारी यांनी यावेळी केला.