जळगाव:- ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या झाली. युपी-बिहारमध्ये कधीकाळी ‘राजकीय हत्या’ हा शब्द चर्चेत असायचा; आता महाराष्ट्रातही तशी परिस्थिती निर्माण होतेय का, हा प्रश्न पडावा अशी वेळ आली आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी दिली आहे.
रोहिणी खडसे म्हणाल्या की, प्रदीप पुर्णेकर गेल्या काही काळापासून परिसरातील ड्रग्जच्या विक्रीविरोधात आवाज उठवत होते. त्याचबरोबर त्यांनी बांधकाम प्रकल्पाविरोधात आंदोलनाची तयारीही केली होती. मग त्यांचा आवाज कुणाला खटकत होता? ड्रग्जविरोधात लढा दिला म्हणून त्यांची हत्या झाली की बिल्डर लॉबीविरोधात आवाज उठवल्याची त्यांना किंमत मोजावी लागली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच हा केवळ एका व्यक्तीच्या हत्येचा प्रश्न नाही; हा महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आहे असंही त्या म्हणाल्या.