खेड : पावसाअभावी रत्नागिरी जिल्ह्यात अनेक तालुक्यातील भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने लांजा, राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यांचा मदतीसाठी समावेश केला असला, तरी जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी, अशी ठाम मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे कोकण प्रदेश सरचिटणीस सी. आर. कांबळे यांनी केली आहे.
पुढे श्री. सी आर कांबळे असे म्हणतात कि, सरसकट मदत मिळण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी कांबळे यांनी केली असून, केवळ काही तालुक्यांचा समावेश करून इतर तालुक्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवणे योग्य नाही. महसूल व कृषी विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून प्रत्येक गावातील नुकसानीची नोंद घ्यावी. आणि शासनाने पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी.
पावसाअभावी पिकांचे उत्पादन घटले असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे “सरसकट मदत” हीच शेतकऱ्यांची प्रमुख मागणी असून शासनाने याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.
संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुकानिहाय भेदभाव न करता सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी. शासनाने सरसकट मदत दिली नाही, तर रिपब्लिकन पक्ष शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा सी. आर. कांबळे यांनी शासनाला दिला आहे.