रत्नागिरी : निवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित निवृत्तीवेतनविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी चिपळूण विभागीय डाक कार्यालयात शुक्रवार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विभागीय डाक पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.

या अदालतीत निवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनशी संबंधित अशा तक्रारींची दखल घेतली जाणार आहे, ज्यांचे मागील तीन महिन्यांत निवारण झालेले नाही. मात्र, वारसा हक्क, उत्तराधिकार तसेच धोरणात्मक स्वरूपाच्या प्रकरणांचा विचार या अदालतीत केला जाणार नाही.

पेन्शनसंबंधी तक्रार असलेल्या संबंधितांनी आपला अर्ज ‘अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, चिपळूण – ४१५६०५’ या पत्त्यावर ६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने पाठवावा. प्रत्येक व्यक्तीने केवळ एकच तक्रार अर्ज सादर करावा. अर्जामध्ये तक्रारीचा सविस्तर तपशील, तक्रारीची तारीख तसेच यापूर्वी मूळ तक्रार ज्या अधिकाऱ्याकडे करण्यात आली होती, त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे.

६ ऑक्टोबरनंतर प्राप्त होणाऱ्या तक्रार अर्जांचा पेन्शन अदालतीत विचार केला जाणार नाही. त्यामुळे संबंधित निवृत्त डाक कर्मचाऱ्यांनी मुदतीपूर्वी आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन डाकघर अधीक्षकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.