गोवळकोट : अंगण मिलन सेवा उपक्रमांतर्गत गोवळकोट येथील अंगणवाडी केंद्रात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
अंगणवाडी सेविका व मदतनीस या केवळ बालकांना शिक्षण देण्याचे कार्य करत नाहीत, तर बालकांचे पोषण, आरोग्य, स्वच्छता, संस्कार तसेच सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतात. चिमुकल्यांच्या जडणघडणीत त्या बजावत असलेल्या या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल त्यांचे कौतुक करून त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त अंगणवाडी केंद्राला महात्मा गांधी यांची फोटो फ्रेम भेट देण्यात आली. तसेच अंगणवाडीतील बालकांना महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याची व विचारांची माहिती समजावून सांगण्यात आली. सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि साधेपणाचा संदेश बालकांना देण्यात आला. यावेळी बालकांना खाऊचे वाटपही करण्यात आले.
दरम्यान, अंगणवाडी सेविका सौ निर्मिती कासेकर मॅडम या प्रसूती रजेवर असल्याने त्यांचा सन्मान त्यांच्या घरी जाऊन करण्यात आला. नुकतेच मातृत्व लाभलेल्या सौ निर्मिती कासेकर मॅडम यांना शुभेच्छा देत त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास अंगणवाडी मदतनीस,आमरीन खतीब, मनस्वि चांदिवडे, प्रियांका गोरीवले, दिपाली बेचावडे, रेश्मा खापरे ,प्राजक्ता गोवळकर तसेच काही पालक उपस्थित होते. अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांच्या पोषण, आरोग्य, शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या कार्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
सौ. प्रणाली अविनाश सावर्डेकर, प्रदेश सचिव – भारतीय जनता पार्टी, अनुसूचित जाती मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश, यांच्या पुढाकाराने हा उपक्रम करण्यात आला.
