दापोली : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, शाखा दापोली यांच्या वतीने आयोजित ‘गुणवंत विद्यार्थी गुणगौरव, शाळा व शिक्षक सन्मान सोहळा २०२६’ हा कार्यक्रम श्रीमंगल कार्यालय, दापोली येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, आदर्श शाळा, सेवानिवृत्त शिक्षक तसेच नवनियुक्त शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमस्थळाचा सभागृह खचाखच भरला असून सुमारे ४०० हून अधिक विद्यार्थी,शिक्षक व मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्त चिटणीस श्री.प्रवीण काटकर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विजय फंड यांनी केले. त्यांनी संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, शाळा आणि सेवानिवृत्त शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यामागील भूमिका स्पष्ट केली.विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणे आणि शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याची समाजाने दखल घेणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास पंचायत समिती दापोलीच्या उपसभापती सौ.नम्रता तोडणकर,जिल्हा परिषद सदस्य किशोरजी देसाई, जिल्हा शिक्षण समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर गोलांबडे, पंचायत समिती सदस्य श्रीराम (भाऊ) इदाते, पंचायत समिती सदस्य श्री. संदीप चिखले, पंचायत समिती सदस्य श्री. राजेंद्र फणसे, सदस्य श्री. नरेश घरटकर,शिक्षण विस्तार अधिकारी श्री बळीराम राठोड ,श्री गणेश पवार, श्री अनिल सुकाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या सोहळ्यात विविध शैक्षणिक व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, आदर्श शाळांचा सन्मान, उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार तसेच सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय दापोली तालुक्यात नव्याने रुजू झालेल्या नवनियुक्त शिक्षकांचेही स्वागत व अभिनंदन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वैभव बोरकर व सौ. अनुराधा देसाई यांनी प्रभावीपणे केले. त्यांच्या निवेदनामुळे संपूर्ण कार्यक्रमाला उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध स्वरूप प्राप्त झाले.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे संघटनेच्या सदस्यांनी स्वतः पुढाकार घेत देणगीच्या माध्यमातून कार्यक्रमासाठी योगदान दिले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सन्मान आणि शिक्षकांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संघटनेच्या सदस्यांनी घेतलेला हा पुढाकार विशेष कौतुकास्पद ठरला.शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व रोख 500/- रुपये प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोलीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी नियोजन, आयोजन आणि व्यवस्थापनासाठी अथक मेहनत घेतली. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हा सोहळा दापोली तालुक्यातील शिक्षक व शैक्षणिक क्षेत्रासाठी एक संस्मरणीय कार्यक्रम ठरला.

“गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, शिक्षकांचा सन्मान आणि शिक्षण क्षेत्रातील चांगल्या कार्याला प्रोत्साहन”

या त्रिसूत्री भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद संघटनेच्या शैक्षणिक कार्याला नवी ऊर्जा देणारा ठरला.