मंडणगड : तालुक्याला सांस्कृतिक क्षेत्रात उंचीवर घेऊन जाणाऱ्या तसेच समाजातील ज्वलंत विषयावर भाष्य करणाऱ्या ‘साज…’ या लघुचित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पणदेरी पाटील वाडी येथे पूर्ण झाले. या लघुचित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन पाले गावातील सुप्रसिद्ध युवा दिग्दर्शक श्री. गणेश सिताराम माळी यांनी केले आहे.

सदर लघुचित्रपट ग्रामीण भागातील महिला, त्यांचे कष्ट, नात्यातील गुंफण आणि आजच्या काळातील सामाजिक आव्हान यावर आधारित आहे. या चित्रपटाला गावचा अस्सल साज यावा यासाठी कोणताही कृत्रिम सेट न वापरता संपूर्ण चित्रीकरण पणदेरी पाटील वाडी येथील वस्तीवर, शेतात, विहिरीवर व घरांमध्ये करण्यात आले.

या लघुचित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पणदेरी पाटील वाडी व कुंभार वाडी, भैरी वाडी, सोनार वाडी, आदिवासी वाडी येथील ग्रामस्थ, महिला मंडळ ,युवक मंडळ आणि ज्येष्ठ नागरिकांनी तसेच श्री अनंत कोबनाक सर व सौ.मयुरी अनंत कोबनाक तसेच ग्रामपंचायत पणदेरी यांनी मोलाचे सहकार्य केले. सर्व कलाकारांची निवास व भोजन व्यवस्था ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने केली. तसेच सर्व कलाकार, टेक्निकल टीम मंडणगड तालुक्यातील असून त्यांनीही चित्रीकरण पूर्ण करण्यासाठी अपार मेहनत घेतली.

यावेळी दिग्दर्शक गणेश सिताराम माळी म्हणाले, “पणदेरी गावाने आम्हाला फक्त जागा नाही तर आपलेपणा दिला. विशेषतः येथील महिलांनी, ज्या खऱ्या अर्थाने या चित्रपटाचा आत्मा आहेत, त्यांनी दाखवलेल्या हिंमतीमुळे ‘साज…’ हा विषय प्रभावीपणे मांडता आला. हा चित्रपट प्रत्येक प्रेक्षकाला अंतर्मुख करेल.”

या लघुचित्रपटाचे छायाचित्रण पूर्ण झाले असून लवकरच तो राज्यस्तरीय व राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात प्रदर्शित केला जाणार आहे.

या चित्रपटामुळे पणदेरी पाटील वाडी गावाचे नाव कलाक्षेत्रात झळकणार असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.