खेड :- येथील सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचालित आय.सी.एस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या 59 व्या महोत्सवात लोकनृत्याच्या चमूने उत्कृष्ट सादरीकरण करत रौप्यपदक पटकावत आपल्या सांस्कृतिक प्रतिभेची दमदार छाप उमटवत, आणखी एका पदकाची कमाई केली आहे. महाविद्यालयाच्या लोकनृत्याच्या चमूने उत्कृष्ट सादरीकरण करत लोकनृत्य स्पर्धाप्रकारात रौप्यपदक पटकावले. या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, युवा महोत्सवातील महाविद्यालयाच्या पदकांची संख्या तीनवर पोहोचली आहे.
मुंबई युवा महोत्सवातील विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये आय.सी.एस. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रभावी प्रदर्शन केले. यापूर्वी मराठी कथाकथन स्पर्धेत एम.एस्सी. संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थी आदित्य मोहिते याने रौप्यपदक, तर बी.एम.एस. विभागातील विद्यार्थी ऋषिकेश देवरुखकर याने तालवाद्य (पखवाज) प्रकारात कास्यपदक पटकावले आहे. त्यानंतर लोकनृत्याच्या चमूने रौप्यपदक मिळवत महाविद्यालयाच्या यशात आणखी एक मानाचा अध्याय जोडला आहे.
लोकनृत्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लोकपरंपरा, संस्कृती आणि कलावैभवाचे प्रभावी दर्शन घडवत महाविद्यालयाच्या चमूने सादरीकरण केले. ताल, लय, उत्स्फूर्तता आणि सांघिक समन्वय यांचा सुरेख मिलाफ असलेल्या या सादरीकरणाला परीक्षकांची दाद मिळाली आणि चमूने रौप्यपदकावर आपले नाव कोरले.
या यशा साठी महाविदयालयाचे सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ. अमोल पाटील, ग्रंथपाल डॉ. राजेश राजम, माजी जनरल सेक्रेटरी कु. आदित्य मोहिते यांनी विशेष मेहनत घेतली. लोकनृत्यासाठी गणेश कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. मंगेशभाई बुटाला, संस्थेचे विश्वस्त व महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲड. आनंदराव भोसले, प्राचार्या प्रो. डॉ. अनिता आवटी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी लोकनृत्याच्या चमूचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.