मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेश कमिटीच्या वतीने शनिवारी (१० ऑक्टोबर) मुंबईतील हुतात्मा चौक येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. मात्र, शांततेत सुरू असलेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासनाने केला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये धरपकड झाल्याचेही पाहायला मिळाले.

दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान पोलिसांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला. मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी, सागर गवई, चेतन अहिरे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. तसेच, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत धक्काबुक्की करण्यात आले. धक्कादायक घटना म्हणजे आंदोलनादरम्यान महिला आघाडीच्या मुंबई सदस्य ज्योती सोनवणे यांना ताब्यात घेताना पुरुष पोलिसांनी अयोग्य पद्धतीने स्पर्श करून कपडे फाडले आणि गैरवर्तन केले. या प्रकरणी BNS च्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराचा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.

‘हिटलरशाही सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है!’ अशा घोषणांसह आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘हुकूमशाही मुर्दाबाद’, ‘नरेंद्र मोदी मुर्दाबाद’, ‘अमित शहा मुर्दाबाद’ आणि ‘हिटलरशाही बंद करो’ अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

यावेळी बोलताना आंदोलकांनी केंद्र सरकारवर टीका केली. सरकार जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळावा आणि ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे हात बळकट करावेत, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले. मुंबईतील या आंदोलनादरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या धरपकडीमुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

दरम्यान, डोंगरी पोलीस ठाण्यात मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे यांच्यासह २५ जणांना नेण्यात आले आहे. तसेच, जे. जे. पोलीस ठाण्यातही २५ कार्यकर्त्यांना ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, येलो गेट पोलीस ठाणे (फोर्ट) येथे स्नेहल सोहनी, सागर गवई, अश्वजीत जगताप, पल्लवी शिंदे, शिल्पा रणदिवे, सतीश राजगुरू, स्वप्नील गायकवाड, दोडके यांच्यासह सुमारे ५० कार्यकर्त्यांना ठेवण्यात आले आहे.