लोटे : लोटे परशुराम औद्योगिक वसाहती मधील एम आर स्पेशालिटी केमिकल्स या कारखान्याच्या गोडाऊनला आग लागुन कच्च्या मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ही घटना काल शनिवार दिनांक दहा रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये एम आर स्पेशलिटी केमिकल्स या नावाचा रासायनिक कारखाना असून या कारखान्याचे कच्च्या व पक्क्या मालाचे गोडाऊन कारखान्याच्या समोरच रस्त्यापलीकडे आहे. कारखान्याचा मुख्य प्लांट रस्त्याच्या एका बाजूला आणि गोडाऊन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असे आहे. या गोडाऊन मध्ये कारखान्यासाठी लागणारा कच्चामाल आणि तयार झालेला पक्का माल ठेवण्यात येतो. काल सकाळी साडेआठ वाजता येथील कच्च्या मालाला अचानक आग लागली आणि आगीने काही वेळातच उग्र स्वरूप धारण केले. मात्र काही वेळातच महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवून आग आटोक्यात आणली. मात्र या घटनेमुळे सुरक्षेबाबतचे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. या गोडाऊन मध्ये आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी कोणतीही सुरक्षा यंत्रणा नाही. तसेच या कारखान्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सुरक्षेचे नियम पाळले जात नाहीत असे अनेक आरोप जमलेल्या ग्रामस्थांनी केले. या घटनेबाबत कारखान्याचे व्यवस्थापक अशोक चौधरी यांना विचारले असता त्यांनाही समाधानकारक उत्तरे देता आली नाही. या कारखान्यामध्ये ठेकेदारी मध्ये काम करणारे कामगार त्यांच्या निवृत्तीच्या वयापेक्षा जास्त वयाचे असल्याचे सुद्धा यावेळी आढळून आले. या कारखान्याच्या मुख्य प्लांटमध्ये सुद्धा सुमारे एक ते दीड वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणात आगीची घटना घडली होती. यामुळे या कारखान्याची सुरक्षा तपासणी औद्योगिक सुरक्षा विभागाकडून करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.