संगमेश्वर : आई-वडिलांचे स्मरण केवळ धार्मिक विधींपुरते मर्यादित न ठेवता, त्यांच्या संस्कारांना समाजसेवेच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचा संवेदनशील आणि अनुकरणीय प्रयत्न लक्ष्मी वात्सल्य संस्थेचे अध्यक्ष तथा निखिल लॉजिस्टिकचे मालक व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी दक्षिण जिल्हा संपर्कप्रमुख, आणि वडाळा विधानसभा प्रमुख मा. श्री. सुरेशभाई कदम यांनी केला आहे. पितृपक्षातील आई-वडिलांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून राबविण्यात आलेला त्यांचा ‘ताटापलीकडील श्राद्ध’ हा उपक्रम परंपरा, कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम ठरला आहे.
आई-वडिलांनी दिलेले संस्कार आणि शिकवलेली माणुसकी समाजाच्या उपयोगी पडावी, या भावनेतून सुरेश कदम यांनी प्रथम आपल्या आई-वडिलांचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर पंचक्रोशीतील नागरिकांसाठी अन्नदान आयोजित करण्यात आले. या उपक्रमात सहभागी झालेल्या जोडप्यांना आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भेटवस्तू देऊन त्यांच्या आठवणींना भावपूर्ण उजाळा देण्यात आला.
श्रद्धेला समाजहिताची जोड देत शिक्षणालाही हातभार
या उपक्रमाचे वैशिष्ट्य केवळ अन्नदानापुरते मर्यादित राहिले नाही. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लागावा, या उद्देशाने लक्ष्मी वात्सल्य संस्थेच्या वतीने माध्यमिक विद्यालय, सोनवडे या शाळेला २५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. तसेच ‘निव्याचा राजा’ गणपती बाप्पा मंडळाला जनरेटर देऊन संस्थेने सार्वजनिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनाही सहकार्य केले.
क्रीडा स्पर्धा, भजन स्पर्धा, टिपरी नृत्य स्पर्धा आणि पंढरपूर वारी अशा विविध उपक्रमांतून लक्ष्मी वात्सल्य संस्था सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रांत योगदान देत आहे. या कार्यातून समाजातील घटकांना एकत्र आणणे, स्थानिक कलांना प्रोत्साहन देणे आणि गरजूंना मदतीचा हात देणे, ही संस्थेची कार्यदिशा अधोरेखित होते.
श्राद्धाच्या परंपरेला माणुसकीचा अर्थ
आई-वडिलांच्या स्मृती जपण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांनी दिलेली मूल्ये आपल्या कृतीतून पुढे नेणे. अन्नदानातून समाधान, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत आणि सार्वजनिक उपक्रमांना सहकार्य अशा कृतींतून सुरेश कदम यांनी कृतज्ञतेला सामाजिक उत्तरदायित्वाची जोड दिली आहे.
श्राद्धातील अन्नदान भूक भागवते, पण संस्कारांतून प्रेरित समाजसेवा अनेकांच्या आयुष्यात आशेचा दीप उजळते. या भावनेचा प्रत्यय देणारा लक्ष्मी वात्सल्य संस्थेचा हा उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. आई-वडिलांच्या स्मृतींचे समाजहिताच्या कार्यात रूपांतर करणाऱ्या सुरेश कदम यांच्या सेवाभावी प्रयत्नांचे कौतुक होत असून, त्यांना उत्तम आरोग्य आणि समाजसेवेचे कार्य अखंड सुरू ठेवण्यासाठी उदंड सामर्थ्य लाभावे, हीच सदिच्छा!
