रत्नागिरी : जिल्हा नियोजन मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत गुहागरचे आमदार आणि विरोधी पक्षाचे एकमेव आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी आक्रमक भूमिका घेत पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्यासह सत्ताधाऱ्यांना विविध मुद्द्यांवर कोंडीत पकडले. निधी वाटपातील कथित दुजाभाव, गुहागर मतदारसंघावर होणारा अन्याय आणि नियोजन मंडळाच्या बैठका घेण्यातील दिरंगाई यावरून त्यांनी थेट सवाल उपस्थित केले.
गुहागर विधानसभा मतदारसंघात लोकप्रतिनिधी, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य किंवा सरपंच नसलेल्या व्यक्तींनी पत्र दिल्यानंतर त्यांना आमदारांपेक्षा चारपट निधी दिला जात असल्याचा मुद्दा आमदार श्री. जाधव यांनी उपस्थित केला. त्याहून गंभीर बाब म्हणजे अशा व्यक्ती दुसऱ्या मतदारसंघातील कामे सुचवतात व त्यांना नियोजन मंडळाकडून मंजुरी मिळत असल्याचे निदर्शनास आणून त्याचा त्यांनी निषेध केला.
एका माजी आमदाराच्या पत्रावर निधी दिला जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत आमदार श्री. जाधव यांनी पालकमंत्री सामंत यांना थेट सवाल केला. “एका माजी आमदाराच्या पत्रावर तुम्ही निधी देत असाल तर मग जिल्ह्यातील सर्व माजी आमदारांच्या पत्रावरही निधी द्या,” अशी मागणी त्यांनी केली. या मुद्द्यावर ना. सामंत यांना सारवासारव करावी लागली आणि यापुढे असे चुकीचे निर्णय होणार नाहीत, अशी भूमिका घ्यावी लागली.
जिल्हा नियोजन मंडळाची यावर्षीची पहिली बैठक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी झाली होती. वर्षातून किमान चार बैठका अपेक्षित असताना त्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी बैठक होत असल्याकडे लक्ष वेधत आमदार श्री. जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, या दिरंगाईचे समाधानकारक स्पष्टीकरण पालकमंत्री ना. सामंत यांना देता आले नाही.
गुहागर मतदारसंघातील विविध योजनांचा निधी आणि मंजूर न झालेल्या कामांची आकडेवारी बैठकीत मांडत “विरोधी पक्षाचा आमदार आहे म्हणून माझ्या मतदारसंघावर जाणीवपूर्वक अन्याय का करता?”, असा सवाल त्यांनी केला. निधी वाटपात राजकीय भेदभाव न करता सर्व मतदारसंघांना समान न्याय देण्याची मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळी जाहीर करावेत, असा ठराव आमदार श्री. जाधव यांनी बैठकीत मांडला.
अलीकडे जिल्ह्यात शासकीय कार्यक्रम अचानक आयोजित करण्याची नवीन प्रथा सुरु झाली आहे. हे तुम्ही तुमच्या सोयीने करता. जिल्ह्यात इतर ठिकाणी तुम्ही ते करा. माझं काही म्हणणं नाही. पण यापुढे माझ्या मतदारसंघात अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित केले तर खपवून घेणार नाही, असाही इशारा आमदार श्री. जाधव यांनी या बैठकीत दिला.
विशेष म्हणजे, बैठकीत सत्ताधारी सदस्यांमध्येच मतभेद उफाळून आलेले पहावयास मिळाले. खासदार श्री. सुनील तटकरे यांची कामे थांबविण्याच्या मुद्द्यावरून श्री. तटकरे आणि मंत्री श्री. योगेश कदम यांच्यात शाब्दिक चकमक झाली. खासदार नारायण राणे यांच्यासह अन्य सत्ताधारी सदस्यांनीही बैठकीच्या फलनिष्पत्तीवर प्रश्न उपस्थित केले.
‘एकटा विरोधी आमदार’ ठरला
सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी
एकीकडे सत्ताधारी सदस्य आपापसातच भिडले असताना एकमेव विरोधी आमदार म्हणून भास्करराव जाधव यांनी निधी वाटपापासून विकासकामांपर्यंत प्रत्येक मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना जाब विचारला.
पुरावे, आकडेवारी आणि नियमांचा आधार घेत उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे पालकमंत्री आणि प्रशासनाची अनेक मुद्द्यांवर कोंडी झाली. त्यामुळे आजची जिल्हा नियोजन मंडळाची बैठक सत्ताधाऱ्यांसाठी आत्मपरीक्षणाची आणि आमदार श्री. भास्करराव जाधव यांच्या आक्रमक भूमिकेची ठरली.