खेड : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ खेड तालुक्यातील मुरडे सुतार रामवाडी, मुरडे खोत शिंदेवाडी, मुरडे गोठल आणि मुरडे मोहल्ला येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन्मान करण्यात आला. खेड नगर परिषदेच्या नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.
अंगणवाडी सेविका म्हणजे निस्वार्थ सेवेचे प्रतीक. कमी मानधनातही त्या बालकांचे पोषण, आरोग्य, पूर्वप्राथमिक शिक्षण आणि मातांच्या आरोग्यविषयक काळजीसाठी सातत्याने कार्यरत असतात. समाजाच्या जडणघडणीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून, त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे ही सामाजिक जबाबदारी आहे. याच भावनेतून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा गौरव करण्यात आला.यावेळी खेड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा तथा भाजप महिला मोर्चाच्या खेड तालुकाध्यक्ष उर्मिला शेट्ये-पाटणे, माजी नगरसेविका तथा भाजप महिला मोर्चाच्या खेड शहराध्यक्ष आशा सनगरे, भाजप महिला मोर्चाच्या खेड शहर उपाध्यक्ष प्रीती चिखले, खेड उपशहराध्यक्ष मिनल गुहागरकर, दीप्ती चिखले, अनिता कोलगे, शशांक सिनकर, भाजप किसान मोर्चाचे खेड तालुकाध्यक्ष लक्ष्मण येसरे, भाजप सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, सदानंद दळवी, मुरडे सोसायटीच्या संचालक शेवंती येसरे, शिल्पा दळवी, वर्षा जाधव, अनिता जोगले आणि रोहिणी जोगले उपस्थित होते.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कार्याचा सन्मान करून त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या उपक्रमातून समाजातील सेवाभावी घटकांचा गौरव करण्याचा संदेश देण्यात आला.