लांजा(गोविंद चव्हाण ) : वारकरी संप्रदाय, संत परंपरा आणि विठ्ठल भक्तीची घोर विटंबना करणाऱ्या व विठ्ठल भक्तांना हिंसक दाखवणाऱ्या ‘ईठ्ठला’ या नाटकाच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाने पुकारलेल्या लढ्याला आता मोठे यश आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळा’ने ८ जून २०२६ रोजी अधिकृत पत्र जारी केले आहे. यात वारकरी संप्रदायाचा अवमान टाळण्यासाठी या नाटकातील सर्व आक्षेपार्ह भाग, श्रीविठ्ठल मूर्ती आणि संतांची नावे तातडीने वगळण्याचे आदेश नाट्य निर्मात्याला दिले आहेत.
रत्नागिरी येथे पार पडलेल्या ६४ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत वीरशैव समाज (लांजा) निर्मित आणि अमोल रेडीज लिखित-दिग्दर्शित ‘ईठ्ठला’ हे नाटक सादर झाले होते. या नाटकातील पात्रांना ‘तुका’, ‘जना’, ‘नामा’ अशी संतांची नावे देऊन त्यांच्या हातून खून आणि मुलाची हत्या दाखवत वारकऱ्यांना गुन्हेगार ठरवले होते. त्याला समितीने व वारकऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. सेन्सॉर बोर्डाचे सचिव सं. पुं. खामकर यांनी नाट्य निर्मात्यांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, नाटकातील पात्रांना दिलेली ‘तुका’, ‘जना’ आणि ‘नामा’ ही संतांची नावे पूर्णपणे बदलण्यात यावीत. नाटकाचे ‘ईठ्ठला’ हे शीर्षक बदलण्यात यावे. नाटकातील प्रमुख कुटुंब हे ‘वारकरी’ न दाखवता निव्वळ एक धार्मिक, साधाभोळा सेवेकरी परिवार दाखवण्यात यावा. तसेच त्यांच्याकडून कोणाचीही हत्या केली जाते असे दाखवू नये, जेणेकरून कोणत्याही विशिष्ट संप्रदायाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत. रंगमंचावर प्रत्यक्ष विठ्ठलाची मूर्ती आणि त्या अनुषंगाने येणारे वादग्रस्त प्रसंग पूर्णपणे टाळण्यात यावेत. तसेच ‘‘कुणाला मारु नये असे कुठे लिवलय का विठ्ठलाने?’’ हे अत्यंत संतापजनक वाक्य संहितेतून कायमचे वगळण्यात यावे. तसेन सुधारित नाट्यसंहिता मान्यतेसाठी सादर करण्यासाठी सांगितले आहेत.